सीईओ प्रशिक्षणाच्या अफवेने ते सहा सदस्य चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:25 AM2020-12-24T04:25:13+5:302020-12-24T04:25:13+5:30
मिनी मंत्रालयाचे सदस्य असून, चुकीच्या पध्दतीने आणि नियमबाह्य कामे करणे, कारभारात हस्तक्षेप करणे, कामे घेणे, टक्केवारी घेणे या कारणांवरून ...
मिनी मंत्रालयाचे सदस्य असून, चुकीच्या पध्दतीने आणि नियमबाह्य कामे करणे, कारभारात हस्तक्षेप करणे, कामे घेणे, टक्केवारी घेणे या कारणांवरून सहा सदस्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या रडारवर आहेत. अशा सदस्यांची कुंडली तयार करण्यात येत असून, नवीन वर्षात या सदस्यांना अपात्रतेसारख्या गंभीर कारवाईचा झटका दिला जाईल, अशी चर्चा सुरू आहे. या कारवाईच्या भीतीने सदस्य धास्तावले असताना, दोन दिवसांपासून वेगळीच चर्चा सुरू आहे. सीईओ जितेंद्र डुडी हे दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाला जाणार आहेत. सीईओ पदाचा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे दिला जाणार असल्याची अफवा सोमवारपासून सुरू आहे.
या अफवेमुळे रडारवर असलेल्या त्या सहा सदस्यांनी धास्ती घेत, थेट सीईआ डुडी यांचे कार्यालय गाठले. साहेब तुम्ही दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाला जाणार आहात. तुम्ही प्रशिक्षणाला गेल्यास आम्ही जिल्हा परिषदेत कशाला येऊ, तुम्ही प्रशिक्षणाला जाऊ नका, ते रद्द करा, अशी विनवणी त्या सदस्यांनी केली. त्या सदस्यांच्या या वक्तव्याने सीईओही बुचकळयात पडले होते. तुम्हाला कोणी सांगितले, मी प्रशिक्षणाला जाणार आहे. सीईओ पद मिळाल्यानंतर पुन्हा अशाप्रकारचे प्रशिक्षण नसते, हेही या सदस्यांना माहिती नाही. सीईओंनी कोणत्याही प्रशिक्षणाला जाणार नसल्याचा खुलासा करताच या सदस्यांना काहीसा धीर मिळाला. दरम्यान, सीईओंच्या प्रशिक्षणाची अफवा आणि सदस्यांनी घेतलेल्या धास्तीची मात्र जिल्हा परिषदेत बुधवारी खमंग चर्चा सुरू आहे.