टाकळीत पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांचा राजीनाम्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:25 AM2021-01-22T04:25:03+5:302021-01-22T04:25:03+5:30
टाकळी : मिरज सलगरे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे नदीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकळी (ता. मिरज) येथील सात हजार लोकवस्ती असलेल्या ...
टाकळी : मिरज सलगरे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे नदीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकळी (ता. मिरज) येथील सात हजार लोकवस्ती असलेल्या गावास गेली दोन महिने पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत रस्त्याचे काम करत असलेल्या राजपथ या कंपनीस वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने टाकळी ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा देण्याचा व उपोषणाचा इशारा दिला. याची राजपथ कंपनीने तात्काळ दखल घेऊन जलवाहिनीचे काम त्वरित करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
विस्तारीकरणादरम्यान रस्त्याच्या मध्यभागी येत असलेली जलवाहिनी रस्त्याकडेला पूर्ववत करण्याचे काम राजपथ इफ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरू आहे. या कंपनीकडून निकृष्ट दर्जाची कामे सुरू असल्याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्य आणि टाकळी ग्रामस्थांनी केली आहे.
नवी जोडणी केल्यानंतर दहा ते पंधरा ठिकाणी जलवाहिनीस गळती लागली आहे. यामुळे दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवणे यांनी सहकारी सहा ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचायत प्रशासन सरपंच, ग्रामसेवक यांंच्याकडे दोन महिने पाणीपुरवठा बंदबाबत पूर्वकल्पना देऊन पर्यायी व्यवस्थेची मागणी केली होती. या मागणीस अनुसरून ग्रामसेवकांनी रस्त्याचे काम करणाऱ्या राजपत कंपनीस पत्रव्यवहार करून जलवाहिनीचे काम होईपर्यंत गावात पाण्याचे टँकर देणे, चांगल्या प्रतीची जलवाहिनी जोडणी करणेबाबत मागणी केली होती. मात्र, राजपथ इफ्रास्ट्रक्चर कंपनीकडून निकृष्ट कामे सुरूच आहेत. शिवाय कामास विलंब केला जात आहे. अवघ्या महिनाभरावर उन्हाळा येऊन ठेपल्याने बंद पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोकोचा पर्याय निवडला. ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील गुळवणे, विमल इटनाळ, वसुंधरा पाटील, महावीर पाटील, अनिल लोखंडे, संजय पुजारी या सदस्यांनी राजीनामा देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. याची राजपूत कंपनीने तात्काळ दखल घेऊन जलवाहिनी त्वरित बदलून देण्याचे व जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत टाकळी व सुभाषनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदस्यांनी आंदोलन पाठीमागे घेतले.
चौकट
गेली दोन महिने टाकळी गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत सरपंच, ग्रामविकास आधिकारी यांना पूर्वकल्पना देऊन पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यास असमर्थ असल्याने आम्ही ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी राजीनामा व उपोषणाचा इशारा दिला होता.
-सुनील गुळवणे, ग्रामपंचायत सदस्य, टाकळी