वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
By हणमंत पाटील | Published: May 29, 2024 09:37 AM2024-05-29T09:37:01+5:302024-05-29T09:37:54+5:30
एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हणमंत पाटील, दत्ता पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, तासगाव (जि. सांगली ) : नातीचा वाढदिवस करून तासगावच्या दिशेने माघारी येत असताना तासगाव- मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत चालकाचा ताबा सुटून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबीय समवेत कारमधून (एमएच 10 एएन 1497) कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस संपवल्यानंतर नात- लेकीसह कुटुंबीयासमवेत माघारी तासगावला येत होते. तासगाव जवळ आल्यानंतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्याजवळ चालक राजेंद्र पाटील यांचा वाहनावरचा ताबा सुटल्याने गाडी थेट कालव्यातकोसळली.
या अपघातात गाडीतील राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 56), त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (वय 52), रा. तासगाव, मुलगी प्रियंका अवधूत खराडे (वय 33), नात दुर्वा अवधूत खराडे (वय 5), दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे ( वय 1), सर्व रा. बुधगाव आणि राजवी विकास भोसले (वय 2) रा. कोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तासगाव पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात नेले.
राजवीचा वाढदिवस ठरला अखेरचाच -
राजवीचा दुसरा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मात्र वाढदिवस संपवून सुट्टीसाठी आजोबांच्या समवेत आजोळी जात असतानाच काळाने घाला घातला. त्यामुळे राजवीचा हा अखेरचा वाढदिवस ठरला असून पाटील कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली आहे या घटनेने तासगाव शहरात शोककळा पसरली आहे.