दोन व्यापाऱ्यांकडून सहा लाख वसूल
By admin | Published: April 5, 2016 11:39 PM2016-04-05T23:39:31+5:302016-04-06T00:07:26+5:30
एलबीटीप्रश्नी कारवाई : मिरजेत महापालिकेची मोहीम; कागदपत्रे केली जप्त
मिरज : मिरजेत महापालिका अधिकाऱ्यांनी थकित एलबीटी वसुली मोहिमेस आज सुरुवात केली. एलबीटीसाठी नोंदणी न करणाऱ्या आकाश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातील कागदपत्रे जप्त करण्यात आली. रंगरेज जनरल स्टोअर्सच्या चालकाकडून ८७ हजार एलबीटी वसुली करण्यात आली. दोन्ही व्यापाऱ्यांकडून सहा लाख रुपयांची वसुली झाली आहे. विनानोंदणी व नोंदणी करूनही कर न भरणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात कारवाईची मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांनी सांगितले.
महापालिका हद्दीतील बारा हजार व्यापारी आहेत. त्यापैकी नऊ हजार व्यापाऱ्यांनी एलबीटीतर्गंत नोंदणी केली आहे. यातील साडेपाच हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी भरला असून विवरणपत्रही दाखल केले आहे. साडेतीन हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी करूनही एलबीटी भरलेला नाही. शिवाय तीन हजार व्यापारी विनानोंदणीच दोन वर्षे व्यवसाय करीत आहेत.
गेल्या आठवड्यात महापौर हारूण शिकलगार यांनी विनानोंदणी व कर न भरलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने मंगळवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. महापालिका उपायुक्त सुनील पवार, सहायक आयुक्त रमेश वाघमारे, निरीक्षक अमर छाचवाले यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी मार्केट परिसरातील आकाश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाची तपासणी केली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री करणाऱ्या संबंधित दुकानदाराने महापालिकेकडे दोन वर्षे नोंदणी न करता व्यवसाय केल्याचे निष्पन्न झाले. महापालिकेच्या पथकाने दुकानातील मालाची तपासणी केली. संबंधित दुकानातील कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेऊन दुकानचालकाकडून पाच लाखांचा धनादेश घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दर्गा चौकातील रंगरेज स्टोअर्सच्या चालकाने एलबीटीतर्गत नोंदणी केली होती. पण एलबीटी भरलेला नव्हता. त्याला कर भरण्यासाठी नोटीसही बजाविण्यात आली होती. त्याच्याकडून ८७ हजार रुपये थकित एलबीटी वसूल करण्यात आली. (वार्ताहर)
तर दोनशे कोटींची एलबीटी वसूल होईल...
विनानोंदणी व कर न भरलेल्या साडेसहा हजार व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसुली झाल्यास ती दीडशे कोटीच्या घरात जाऊ शकते, असा अंदाज आहे. दोनच व्यापाऱ्यांकडून सहा लाख वसूल झाले आहेत. शिवाय विवरणपत्र तपासणीतून पन्नास कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. एलबीटीची संपूर्ण वसुली झाल्यास पालिकेच्या तिजोरीत दोनशे कोटी जमा होऊ शकतात, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
आता जप्ती : नंतर थेट फौजदारी करणार
महापालिकेने एलबीटीत नोंदणी केलेले, पण कराचा भरणा न केलेले साडेतीन हजार व विनानोंदणी तीन हजार अशा साडेसहा हजार व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या व्यापाऱ्यांना पूर्वी नोटिसा दिल्या होत्या. पण त्यांनी महापालिकेला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता नोंदणी न केलेले व कर न भरलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय व्यापाऱ्यांवर फौजदारीही दाखल करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.