शिराळा तालुक्यात सापडली सहा शाळाबाह्य मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:08+5:302021-03-18T04:25:08+5:30
सहदेव खोत लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : १ मार्च ते १० मार्च या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणात शिराळा तालुक्यात एकूण ...
सहदेव खोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत :
१ मार्च ते १० मार्च या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणात शिराळा तालुक्यात एकूण १४ केंद्रांपैकी तीन केंद्रांत सहा शाळाबाह्य मुले आढळून आली. शिक्षण विभागाने संबंधित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. शिवाय या सर्वेक्षणात स्थलांतरित होऊन तालुक्यात आलेली; परंतु शाळाबाह्य नसलेली १०० मुलेही आढळून आली.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व अंगणवाडी सेविकांनी प्रगणक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली. शिराळा तालुक्यात ५६४ प्रगणकांनी तालुक्यातील ११ केंद्रातील ३४ हजार ६७३ कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण केला. नाटोली, रिळे व शिराळा केंद्रात प्रत्येकी दोन अशी एकूण सहा शाळाबाह्य मुले आढळून आली. यामध्ये पाच मुले व एका मुलीचा समावेश आहे. या शाळाबाह्य मुलांमध्ये चार मुले विशेष गरजाधिष्ठित आहेत तर दोन मुले अन्य कारणांनी शाळाबाह्य झाल्याचे आढळून आले आहे.
तालुक्यात स्थलांतरित होऊन आलेली १०० मुले आढळून आली. त्यामध्ये बीड, जालना, नंदुरबार जिल्ह्यातून आलेल्या ८३ मुलांचा तर मध्यप्रदेश, कर्नाटक या परराज्यातून आलेल्या १७ मुलांचा समावेश आहे; परंतु ही मुले त्यांच्या मूळ गावी शिक्षणाच्या प्रवाहात असल्याचे निदर्शनास आले. ही सर्व मुले आता आपापल्या गावी परतली आहेत.
तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, विस्तार अधिकारी विष्णू दळवी, बाजीराव देशमुख, सर्व केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती मधुकर डवरी, पांडुरंग गायकवाड यांच्यासह समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रगणकांनी यासाठी परिश्रम घेतले.