भोसेत सहा घरांवर दरोडा

By admin | Published: January 31, 2016 12:44 AM2016-01-31T00:44:16+5:302016-01-31T00:45:06+5:30

दोघांना लोखंडी गजाने मारहाण

Six robbery houses in Bhoset | भोसेत सहा घरांवर दरोडा

भोसेत सहा घरांवर दरोडा

Next

मिरज : भोसे (ता. मिरज) येथे शनिवारी मध्यरात्री दोन वाजता दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून सहा ठिकाणी दरोडा टाकत सुमारे आठ लाखांचा ऐवज लंपास केला. सहा ते सातजणांनी गावाबाहेर असलेल्या वस्तीवरील घरांमध्ये शिरून चाकूचा धाक दाखवून ही लूटमार केली. त्यांना प्रतिकार करणाऱ्या दोघांना लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे भोसे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे, शनिवारी मध्यरात्री दोन वाजता तोंडाला स्कार्प बांधलेल्या ३० ते ३५ वयाच्या सहा ते सात दरोडेखोरांनी भोसे गावात प्रवेश केला. गावाबाहेरील वस्तीवरील वसंत कैकाडी यांच्या घरात शिरून त्यांनी मौल्यवान ऐवजाची शोधाशोध केली. मात्र, तेथे रक्कम किंवा दागिने सापडले नसल्याने जवळच असलेल्या निवृत्त शिक्षक अधिकराव भीमराव चव्हाण यांच्या घराकडे मोर्चा वळवीला. चव्हाण यांच्या घराचा दरवाजा कटावणीने तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी चव्हाण कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. याच पद्धतीने गावाबाहेर असलेल्या वस्तीवरील अरविंद नेमगोंडा पाटील, मलगोंड जिनगोंडा पाटील, वसंत शंकर सुतार यांच्यासह पोलीस कर्मचारी बाळासाहेब नाना खोत यांच्या शेतातील मजूर तातोबा गायकवाड यांच्या घरात शिरून चाकूचा धाक दाखवीत लूटमार केली.
पाचजणांच्या घरातून सुमारे २५ तोळे सोन्याचे दागिने व एक लाखाची रोख रक्कम लुटण्यात आली. (पान १० वर) पोलीस कर्मचारी बाळासाहेब खोत यांच्या शेतातील घरात राहणारा मजूर तातोबा गायकवाड याच्या घरातील ऐवजही लुटला. तातोबा गायकवाड यांनी चोरट्यांना प्रतिकार करत मोबाईलवरून खोत यांना दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केल्याने एकाने गायकवाड यांच्या हातावर लोखंडी गजाने मारहाण करून मोबाईल फोडून टाकला. चोरीप्रकरणी तातोबा गायकवाड यांनी सहा ते सात दरोडेखोरांनी घरातील सोने व रोख रक्कम असा ऐवज लुटल्याची फिर्याद ग्रामीण पोलिसांत दिली आहे. (वार्ताहर)
एका टोकाला पोलीस, दुसऱ्या टोकाला दरोडा
ग्रामस्थांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक विजय मराठे यांच्यासह ग्रामीण पोलिसांचे पथक गावात पोहोचले. चव्हाण वस्तीवर अधिकराव चव्हाण यांच्या घरात पहाणी करीत असताना दरोडेखोरांनी गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या अरविंद पाटील यांच्या घरात लूटमार केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचेपर्यंत त्यांनी पलायन केले. दरोडेखोरांनी भोसे व सोनी हद्दीत असलेल्या वस्त्यांवरील घरांना लक्ष्य करीत लूटमार केली.
घरांना कड्या घातल्या, मोबाईल काढून घेतले
चोरटे मराठीत बोलत होते. त्यांनी दोन ठिकाणी बंद घराचे दरवाजे मोडून काढले, तर चार ठिकाणी हाका मारून दरवाजा उघडण्यास भाग पाडले. घरातील कुटुंबीयांना दरडावून चाकूचा धाक दाखवत घरातील मौल्यवान ऐवज शोधला. लूटमार करून घराला कड्या लावून कोंडून घातले. कोणाशी संपर्क साधू नये यासाठी एकाच्या मोबाईलचा चक्काचूर केला. अन्य तिघांचे मोबाईल काढून घेऊन जाताना शेतात टाकून दिल्याचे आढळले. चोरट्यांनी अरंिवंद पाटील यांच्या घरात चोरी करून शेजारी असलेल्या द्राक्षबागेत बसून द्राक्षे खाल्ल्याचे आढळले.
तीन तास थरार...
दरोडेखोरांचा तीन तास गावात धुमाकूळ सुरू होता. प्रत्येक घरात सुमारे अर्धा तास शोधाशोध करीत साहित्य विस्कटून टाकले. पोलिसांनी सकाळपर्यंत गावाभोवती सर्वत्र शोध घेतला; मात्र दरोडेखोर सापडले नाहीत. त्यांच्या शोधासाठी श्वानपथक आणण्यात आले. श्वानपथकाने गावातील ओढ्यातून अंगणवाडीपर्यंत माग काढला. तेथून दरोडेखोर पंढरपूर महामार्गाच्या दिशेने गेल्याचा अंदाज आहे.
लोखंडी गजाने मारहाण
अरविंद पाटील यांच्या घरात लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांना शेजारी राहणाऱ्या संजय पाटील यांनी प्रतिकार केला. त्यांनी एकास पकडण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी संजय पाटील यांना दगडाने व लोखंडी गजाने मारहाण करून पलायन केले.


 

Web Title: Six robbery houses in Bhoset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.