तासगावात टीटीएसला मुकणार सहा हजार विद्यार्थी

By admin | Published: March 10, 2017 11:04 PM2017-03-10T23:04:48+5:302017-03-10T23:04:48+5:30

लोकप्रतिनिधी करणार पाठपुरावा : पालकांचा आंदोलनाचा इशारा; परीक्षेमुळे शाळांचा विकास

Six thousand students who lost TTS in Tasgaon | तासगावात टीटीएसला मुकणार सहा हजार विद्यार्थी

तासगावात टीटीएसला मुकणार सहा हजार विद्यार्थी

Next

तासगाव : तासगाव तालुक्यातील पहिली ते तिसरीपर्यंतच्या तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी तासगाव टॅलेंट सर्च परीक्षेचा वर्षभर कसून सराव केला आहे. मात्र ऐनवेळी शिक्षण संचालकांनी परीक्षाच न घेण्याचा आदेश दिल्यामुळे तालुक्यातील तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून मुकावे लागणार आहे. तसेच ही परीक्षा व्हावी, या मागणीसाठी पालकांकडून प्रसंगी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे.
तासगाव तालुक्यात टीटीएस परीक्षेमुळे जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगीण कायापालट झाला. खासगी परीक्षांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पंचायत समितीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या टीटीएस परीक्षेच्या निर्णयाला त्यामुळे खोडा बसला आहे. पहिली ते तिसरीपर्यंतच्या सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी वर्षभर कसून या परीक्षेचा सराव केला. शिक्षकांनीही शाळेच्या नावलौकिकासाठी जादा वेळ देऊन विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला. मात्र शिक्षण संचालकांच्या आदेशामुळे सहा हजार विद्यार्थ्यांना या परीक्षेला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता यावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अर्जुन पाटील, चंद्रकांत पाटील यांनी, टीटीएस परीक्षेसाठी शिक्षण संचालकांपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. आमदार सुमनताई पाटील यांच्या माध्यमातून, या परीक्षेला मान्यता मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले. तसेच तालुक्यातील बहुसंख्य शाळांतील पालकांनीदेखील, ही परीक्षा होण्यासाठी प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)




टीटीएस परीक्षा सुरु झाल्यापासून मराठी शाळांमध्ये पटवाढ चांगली झाली आहे. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मराठी माध्यमाकडे येत आहेत. या परीक्षेमुळे पाचवी शिष्यवृत्तीची तयारी होण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेचा विकास, आकलन क्षमतेचा विकास होण्यास मदत झाली आहे. या परीक्षेत अभ्यासक्रमास अनुसरुन प्रश्नपत्रिका असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. मराठी शाळेची स्वकष्टातून कमावलेली प्रतिमा अबाधित राहायची असल्यास, टीटीएसची परीक्षा होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कोणतीही सकारात्मक तडजोड करायला पालक, शिक्षक तयार आहेत. त्यामुळे ही परीक्षा काळाची गरज आहे.
- सुरेश माळी, उपशिक्षक, जि. प. शाळा, रामलिंगनगर.
टीटीएस परीक्षेमुळे आरवडेतील जिल्हा परिषदेच्या शाळेचा नावलौकिक झाला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा तर मिळालीच, किंंबहुना गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळातील स्पर्धेला सामोरे जाण्याचे कसबही या परीक्षेमुळे प्राप्त झाले. त्यामुळे टीटीएस परीक्षेला परवानगी मिळाली नाही, तर सर्व पालक आंदोलन करतील.
सतीश चव्हाण, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती,
जि. प. शाळा आरवडे, ता. तासगाव.

टीटीएस या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे तालुक्यातील शाळांना गुणवत्तेच्या बाबतीत नावलौकिक प्राप्त झाला. या उपक्रमामुळे पहिलीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना आॅक्टोबरअखेर लिहिता, वाचता येऊ लागले. शिक्षण संचालकांचा खासगी परीक्षेसाठीचा आदेश योग्य आहे. मात्र त्याची तुलना या परीक्षेशी होऊ शकत नाही. ही परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांवर ताण येत नाही.
- रेवणसिध्द होनमोरे, शाळा, शिवाजीनगर (सावळज)

जिल्हा परिषदेवरून परीक्षा सुरू व्हावी
जिल्हा परिषद केंद्र शाळा, बोरगावचे उपशिक्षक बाबासाहेब यादव म्हणाले की, विद्यार्थ्यांवर येणारा अतिरिक्त ताण, पालकांना होणारा आर्थिक भुर्दंड याचा विचार करुन शिक्षण संचालकांनी ही स्पर्धा परीक्षा बंदीचा आदेश काढला आहे. मात्र शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, यासाठी तासगाव टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यामध्ये पालकांना कोणताही आर्थिक भुर्दंड नाही. शिष्यवृत्ती परीक्षेची भीती दूर व्हावी, यासाठी या परीक्षेचा उपयोग झाला आहे. या परीक्षेमुळे शाळेच्या, गावाच्या लौकिकात भर पडली. किंंबहुना पालक, गावातील नागरिकांकडूनही शाळेला प्रोत्साहन देण्यासाठी लोकवर्गणी जमा होऊ लागली. त्यामुळे अनेक शाळांचा कायापालटही झाला आहे. ई लर्निंग सुरु होऊन शाळा डिजिटल झाल्या. यांसह अनेक सकारात्मक गोष्टी घडल्यामुळे, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडील ओढा कमी झाल्याचे चित्रही पाहायला मिळाले. खासगी परीक्षा बंद झाल्याच पाहिजेत, मात्र पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरुन होणाऱ्या परीक्षा सुरु राहायलाच हव्यात.

Web Title: Six thousand students who lost TTS in Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.