बांबवडेच्या डोंगरावरील सहा हजार झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:34+5:302021-04-30T04:32:34+5:30
बांबवडे (शिराळा) येथील गायरान क्षेत्राला लागलेल्या आगीत सहा हजार रोपांची राख झाली. लोकमत न्यूज नेटवर्क वाटेगाव : बांबवडे ...
बांबवडे (शिराळा) येथील गायरान क्षेत्राला लागलेल्या आगीत सहा हजार रोपांची राख झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : बांबवडे (ता. शिराळा) येथील सार्वजनिक गायरान क्षेत्रातील तेरा एकरांत मागील दोन वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाकडून विविध जंगली जातींच्या सहा हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी अज्ञाताने डोंगरास आग लावल्याने या परिसरातील सर्वच झाडे जळून भस्मसात झाली.
मागील दोन वर्षांत या रोपांचे संवर्धन चांगल्या पद्धतीने केले हाेते. झाडांची वाढ ही उत्तम होती. त्यामुळे पावसाळ्यात दोन्ही गायरान क्षेत्र हिरवेगार दिसत होते; पण चालू वर्षी या रोपांचे संवर्धन करण्याचा विसर सामाजिक वनीकरण विभागाला पडला. यामुळे ऐन उन्हाळ्यात तेरा एकरांतील झाडांची राख झाली. सामाजिक वनीकरण विभागाकडून उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाडांच्या चारही बाजूंनी जाळ पट्टी काढायला हवी होती. ही जाळ पट्टी काढली नसल्याने या क्षेत्रातील झाडे जळून गेली. पावसाळा संपल्यानंतर झाडांना पाण्याची गरज असताना झाडांना पाणीदेखील मिळाले नाही. यामुळे अनेक लहानमोठी रोपे वाळून गेली. मागील चार दिवसांपूर्वी अज्ञाताने डोंगरास आग लावल्याने ही आग आटोक्यात न आल्याने या परिसरातील डोंगर पेटले आणि सर्वच झाडे जळून भस्मसात झाली. होरपळलेली झाडे पावसाळ्यात पुनर्जीवित होणार का, अशी चर्चा या परिसरात होत आहे. या घटनेकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.