मिरजेत पोलीस ठाण्यातून वाळूचे सहा ट्रक पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2016 01:21 AM2016-02-25T01:21:34+5:302016-02-25T01:21:34+5:30
सात जणांवर गुन्हा : महसूल विभागाने घेतले होते ताब्यात
मिरज : मिरजेत वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने ताब्यात घेतलेले सहा वाळूचे ट्रक पोलीस ठाण्यातून परस्पर पळवून नेण्यात आले. बुधवारी मध्यरात्री मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातून वाळूसह सुमारे ५२ लाख रुपये किमतीचे सहा ट्रक चोरून नेल्याबद्दल मंडल अधिकारी विजय ढेरे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रक मालक व चालक अशा अकरा जणांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवड्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातून बेगमपूर येथून वाळूची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक तहसीलदारांनी मिरज-पंढरपूर रस्त्यावर ताब्यात घेतले होते. अवैध वाळू वाहतूकप्रकरणी दंडात्मक कारवाई व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी हे आठ ट्रक मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते. बुधवारी मध्यरात्री यातील एमएच १० एक्यू ३३३७ (किंमत नऊ लाख रूपये), एमएच ०४ पीयु २७६१ (सहा लाख ५० हजार), एमएच १० बीआर ३९२७ (११ लाख ५० हजार) असे सुमारे ३८ लाख ५० हजाराचे हे चार व इतर दोन, असे सहा ट्रक बनावट किल्लीचा वापर करून वाळूसहीत चोरून नेले.
याबाबत मिरजेचे मंडल अधिकारी विजय ढेरे यांनी, अनिल सूर्यवंशी (रा. जयसिंगपूर), तानाजी माने, तानाजी जाधव (रा. मंगळवेढा), पापा रामू राठोड (रा. जयसिंगपूर), बाबू केशव जाधव (रा. मंगळवेढा), मालक राजकुमार घाडगे (कवठेमहांकाळ) व चालक खंडू ईश्वर चव्हाण, प्रदीप पाटील, अनिल रायचूरकर (दोघे रा. सांगलीवाडी), दीपक खोत, बिरू बाळू मेटकरे (रा. घेरडी, ता. सांगोला ) या सर्वांनी संगनमताने ट्रक चोरून नेल्याचे ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातून एकाचवेळी चार ट्रक चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)