चाळीस वर्षांत सहा पाणी योजना; पदरी मात्र निराशा : प्रशासनाचे अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:22 PM2018-05-31T23:22:28+5:302018-05-31T23:22:28+5:30
गेल्या चाळीस वर्षात शासनाने आतापर्यंत पाच नळपाणी पुरवठा योजना, तसेच लोकसहभागातून सहावी जनकल्याण पाणी पुरवठा योजना राबवली.
संजयकुमार गुरव ।
डफळापूर : गेल्या चाळीस वर्षात शासनाने आतापर्यंत पाच नळपाणी पुरवठा योजना, तसेच लोकसहभागातून सहावी जनकल्याण पाणी पुरवठा योजना राबवली. या सर्व योजनांसाठी करोडो रुपये खर्च झाले. लाखो रुपये टँकरसाठी शासनाने खर्च केले. परंतु डफळापूरकरांची कायमस्वरुपी पाण्याची तहान भागविण्यात प्रशासनाला आतापर्यंत अपयशच आले आहे. पाण्याबाबत शापित असलेले डफळापूरचे ग्रामस्थ भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहेत.
डफळापूर गावासाठी प्रथम मिरवाड तलावाद्वारे, तर दुसरी डफळापूर तलावाद्वारे या नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या. लोकसंख्या वाढत गेल्याने व घरगुती कनेक्शन्स मोठ्या प्रमाणात देण्यात आल्याने हे पाणी अपुरे पडू लागले. ऐन उन्हाळ्यात हे दोन्ही तलाव कोरडे पडू लागल्याने या योजना कुचकामी ठरु लागल्याने डफळापूर गावाला गेल्या पंधरा वर्षात शासकीय व खासगी टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. आजही खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरुच आहे. टँकरने पाणी विकत घेण्याची सवयच लागली आहे.
बसप्पाचीवाडी तलावाद्वारे डफळापूर, अंकले, बाज, बेळुंखी, मिरवाड या पाच गावांसाठी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. पंधरा वर्षे झाली, आठ कोटी रुपयांची ही योजना अर्धवट स्थितीत राहिली. तलावात पाणी नसल्याने या योजनेला गती आली नाही. डफळापूरसाठी ही तिसरी पाणी पुरवठा योजना होती. अंतिम टप्प्यात काम बंद झाले. या योजनेसाठी शासनाचे सुमारे पाच कोटीचे नुकसान झाले.
डफळापूरसाठी चौथी पाणी पुरवठा योजना पाच किलोमीटर अंतरावरील खलाटी येथे राबविण्याचा प्रयत्न केला गेला. भारत निर्माण योजनेतून येथे विहीर खोदण्यात आली. परंतु विहिरीला मुबलक पाणी न लागल्यामुळे पाणी नसल्याने ही योजना ठप्प झाली. हीच योजना राष्ट्रीय पेयजल योजनेला वर्ग करुन डफळापूरसाठी पाचवी नळपाणी पुरवठा योजना बसप्पाचीवाडी तलावाद्वारे राबविण्यात येत आहे. अनेक अडथळे पार करत ही योजना पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.
शासनाच्या पाणी पुरवठा योजनांवरील विश्वास उडाल्याने डफळापूरकरांनी लोकवर्गणीतून अकरा लाख रुपये खर्च करुन अवघ्या एकवीस दिवसात प्रा. रणजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच विहिरीतून जनकल्याण पाणी पुरवठा योजना राबविली. तीन महिने ही योजना पूर्ण ताकतीने चालली. परंतु पाण्याअभावी योजना ठप्प झाली. जसे पाणी उपलब्ध होईल तसे ही योजना चालू राहणार असल्याचे प्रा. रणजित चव्हाण यांनी सांगितले.