राज्यातील ५११ गावांत कौशल्य विकास केंद्रे; गुरुवारी पंतप्रधान करणार उदघाटन
By संतोष भिसे | Published: October 17, 2023 06:52 PM2023-10-17T18:52:17+5:302023-10-17T18:53:01+5:30
ग्रामीण युवकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार आहेत.
सांगली : ग्रामीण युवकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार आहेत. गुरुवारी (दि. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात ऑनलाईन स्वरुपात उपक्रमाचे उदघाटन करणार आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १२ गावांतील केंद्रांचा समावेश आहे. राज्यभरात ५११ गावांत केंद्रे सुरु होतील.
जिल्ह्यात पेठ, कासेगाव, वाळवा (ता. वाळवा), मालगाव, कांचनपूर (ता. मिरज), मांगले (ता. शिराळा), वांगी (ता. कडेगाव), रांजणी (ता. कवठेमहांकाळ ) भाळवणी (ता. खानापूर), सावळज, मणेराजुरी (ता. तासगाव), उमदी (ता. जत) याेथे केंद्रे सुरु होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मंगळवारी याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, खेड्याकडून रोजगारासाठी शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्रे सुरु केली जात आहेत. तरुणांना गावातच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न असेल.