अल्पसंख्याक समुदायातील लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण द्या : गोपिचंद कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 05:25 PM2019-07-30T17:25:20+5:302019-07-30T17:26:12+5:30
ल्पसंख्याक समुदायाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ द्यावा. सेवा क्षेत्र, स्थानिक मागणी, समाजाची गरज ओळखून त्याप्रमाणे त्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी दिल्या.
सांगली : अल्पसंख्याक समुदायाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ द्यावा. सेवा क्षेत्र, स्थानिक मागणी, समाजाची गरज ओळखून त्याप्रमाणे त्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनाज मुल्ला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या अल्पसंख्याक समुदायातील लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे. बँकेकडून कर्ज सहाय्यबाबत काही अडचणी येत असल्यास त्याबाबतची तक्रार संबधितांना द्यावी. अल्प मुदत तंत्र प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.
आमदार शिवाजीराव नाईक व आमदार सुधीर गाडगीळ यांनी अल्पसंख्याक समुदायाच्या कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहचवून त्यांना लाभ देण्याबाबत विविध विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री यांच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवांची पुरेशी उपलब्धता, शालेय शिक्षणाच्या उपलब्धतेत सुधारणा करणे, उर्दू शिक्षणासाठी अधिक संसाधन, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, अल्पसंख्याक समुदायातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संरचनेत सुधारणा करणे, गरीबांसाठी स्वयंरोजगार आणि मजुरी रोजगार, तंत्र प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य वृध्दी, आर्थिक कार्यासाठी कर्ज सहाय्य, राज्य आणि केंद्रीय सेवांमध्ये भर्ती, ग्रामीण गृह योजनेत समान वाटा, अल्पसंख्याकांच्या झोपडपट्ट्यांमध्ये सुधारणा, जातीय घटनांना आळा घालणे, जातीय गुन्ह्यासाठी खटले चालविणे व जातीय दंगलींना बळी पडलेल्यांचे पुनर्वसन आदि विषयांवर सविस्तरपणे चर्चा करून संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आले.