Sangli: कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटी उत्साहात, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून देशात प्रसिद्ध
By श्रीनिवास नागे | Published: July 29, 2023 05:27 PM2023-07-29T17:27:14+5:302023-07-29T17:29:54+5:30
दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा
प्रताप महाडीक
कडेगाव : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपुर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल २०० वर्षांची परंपरा लाभलेल्या कडेगाव जिल्हा सांगली येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला हा सोहळा थाटात संपन्न झाला.
शनिवार(दि २९) सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापुर, सोहोली, निमसोड, वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत- गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी ११ वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला.
हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान , आत्तार, शेटे, माईनकर आणि अन्य उंच ताबूत माना प्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला. आणि सातभाई पाटील - बागवान - अत्तार - हकीम, या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी 11.30 वाजता संपन्न झाल्या.
सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले. इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद.. धूला धूला आशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान वाटेत तांबोळी, शेटे व अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर माईनकर यांचा ताबूत उचलण्यात आला. मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले. सर्व ताबूत माना प्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) या ठिकाणी एकत्रित केले गेले.
त्या ठिकाणी मेलवाल्याकडून ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे’ या ऐक्याच्या संदेशाने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर हिंदू मानकऱ्यामार्फत मसूद माता ताबूत पंजे, बारा इमाम पंजे मानकऱ्यामार्फत आणण्यात , आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. या ठिकाणी माना प्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने १२५ ते १५० फूट उंचीच्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले. दुपारी २.३० वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले.
यावेळी माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जि.प.अध्यक्ष संग्रामसिह देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, डॉ जितेश कदम, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम आदी मान्यवर व नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक यांचेसह हिंदू-मुस्लिम बांधव, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.