रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:37 AM2020-03-01T00:37:01+5:302020-03-01T00:37:11+5:30
वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे.
संतोष भिसे ।
सांगली : रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गांसाठी तब्बल ४५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे वीस हजार झाडांची तोड केली आहे. त्यांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षलागवडीकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणप्रेमींमधूनही त्यावर आवाज उठविला जात नसल्याची स्थिती आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा (एनएच १६६) ६६ किलोमीटर भाग व गुहागर-विजापूर (१६६ ई अणि एनएच २६६) महामार्गाचा सुमारे १९0 किलोमीटर भाग सांगली जिल्ह्यातून जातो. रत्नागिरी-नागपूरची रुंदी ९0 फूट व गुहागर-विजापूर ४६ फूट रुंदीचा रस्ता आहे. त्यासाठी दुतर्फा हजारो झाडे तोडली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, सामाजिक वनीकरण, स्थानिक नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील झाडे नेस्तनाबूत केली जातील. त्याशिवाय खासगी श्ोतीतील झाडांची संख्याही मोठी आहे.
वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे. वृक्ष रुजल्यावर ती परत दिली जाईल; पण सद्य:स्थितीत ठेकेदारांनी कोठेही वृक्षारोपण सुरू केलेले नाही.
१००-२०० वर्षांपूर्वीची झाडे
दोन्ही महामार्गांसाठी १७ हजार ७७९ झाडे तोडण्याची परवानगी वनविभागाकडे मागितली आहे. खासगी शेतीतील सुमारे ३० हजार झाडांसाठी कृषी विभागाकडे मूल्यांकनाची विनंती करण्यात आली आहे.
क-हाड, विटा, मिरज, नागज, पलूस, कडेगाव, आष्टा, तासगाव, भिवघाट, जत परिसरातील झाडे तोडली जातील. पैकी मिरज-पंढरपूर मार्गावर वेगाने वृक्षतोड सुरू आहे. बरीच झाडे १००-२०० वर्षांपूर्वीची तसेच संस्थानकाळातील आहेत. ती तोडल्याने अनेक ठिकाणच्या सुंदर कमानी नष्ट झाल्या आहेत. हा रस्ता उजाड बनू लागला आहे.
महामार्गाचे काम गतीने : सांगली जिल्ह्यात मिरज ते भोसेदरम्यान रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडल्याने अशा अनेक नैसर्गिक कमानी इतिहासजमा होत आहेत. दीड-दोनशे वर्षे जुनी वडाची झाडे तोडून त्यांचे ओंडके ठिकठिकाणी टाकले आहेत.