कारवाईत जप्त केलेल्या जनावरांची गोशाळांकडूनच कत्तल, पांजरपोळसाठी सुधारित नियमावली जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 05:21 PM2022-11-07T17:21:25+5:302022-11-07T17:22:17+5:30
कारवाईमध्ये जप्त केलेल्या जनावरांचे टॅगिंग करण्याचे महत्त्वाचे आदेश शासनाने दिले
संतोष भिसे
सांगली : कत्तलीसाठी नेण्यात येत असलेले पशू व गोवंशातील जनावरे सुटकेनंतर गोशाळा व पांजरपोळमध्ये ठेवण्यात येतात. पण, राज्यातील काही गोशाळांकडूनच जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या विकले जात असल्याच्या घटना शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे नवी नियमावली जारी केली असून, अधिक कडक तरतुदी लागू केल्या आहेत.
राज्यात गोवंशाची बेकायदा वाहतूक व कत्तलीला बंदी आहे, तरीही गोवंश हत्येच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. काही प्राणीप्रेमी व गोसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून पशुंची सुटका केली जाते. गुन्हे दाखल होऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर ही जनावरे अधिकृत गोशाळा किंवा पांजरपोळमध्ये दाखल केली जातात. पण या गोशाळांकडूनही जनावरांना पुन्हा कत्तलीसाठी दिले जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे दाखल झाल्या आहेत. या अमानवी आणि धक्कादायक कृत्यांना आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शुक्रवारी (दि. ४) नव्याने नियमावली जारी केली.
कायदेशीर कारवाईत ताब्यात घेतलेल्या जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून त्याच दिवशी तसा दाखला घ्यायचा आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय कोणत्याही जनावराला गोशाळेकडे सुपुर्द करण्यास प्रतिबंध आहे. गोशाळेकडे जनावरे हस्तांतरित करण्यापूर्वी पशुसंवर्धन उपायुक्त किंवा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या सचिवाची लेखी संमती सक्तीची आहे. संबंधित गोशाळा किंवा पांजरपोळमध्ये पुरेशा सुविधा असाव्यात. गोशाळा चालकांविरोधात पशुसोबत क्रूर वागणुकीचे गुन्हे दाखल नसावेत.
जप्त जनावरांची नोंद पोलिसांत करावी. पशुसंवर्धन उपायुक्तांच्या परवानगीशिवाय जनावरांचे हस्तांतरण करता येणार नाही, शिवाय शेतकऱ्यांना विक्रीही करता येणार नाही. त्यांना वापरासाठीही देता येणार नाही. गोशाळेत किंवा पांजरपोळमध्ये जनावराचा मृत्यू झाल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र सक्तीचे आहे. प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या मासिक बैठकीत या जनावरांविषयी आढावा घ्यायचा आहे.
जनावरांचे टॅगिंग होणार
कारवाईमध्ये जप्त केलेल्या जनावरांचे टॅगिंग करण्याचे महत्त्वाचे आदेश शासनाने दिले आहेत. तसेच त्यांच्या नोंदी इनाफ प्रणालीमध्ये करायच्या आहेत. टॅगिंगमुळे जनावरांच्या स्थलांतराला, हस्तांतराला आळा बसणार आहे. गोशाळांमधील गैरकृत्यांवर लक्ष राहणार आहे.