विटा-गार्डी रस्त्यावर झाडांची कत्तल
By Admin | Published: December 12, 2014 10:53 PM2014-12-12T22:53:23+5:302014-12-12T23:32:35+5:30
तक्रारीनंतर वृक्षतोड बंद : अभय भंडारी यांची जागरुकता; ठेकेदारावर कारवाईची मागणी
विटा : विटा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने निविदा काढून ठेका दिलेल्या एका ठेकेदाराने विटा ते गार्डी रस्त्यावर धोकादायक नसलेल्या सुमारे ७० ते ७५ वर्षापूर्वीच्या झाडांवर कुऱ्हाड चालवून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, येथील पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते अभय भंडारी यांनी याबाबत आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने संबंधित वृक्षतोड बंद करण्यात आली. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने धोकादायक झाडांऐवजी धोका नसलेली लिंबाची पुरातन झाडे तोडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
खानापूर तालुक्यातील विटा-मायणी या राज्यमार्गावर रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ७० ते ७५ वर्षांपासूनची पुरातन लिंब व वडाची झाडे आहेत. यातील काही झाडे वाहनधारकांसाठी धोक्याची आहेत. काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे गार्डी परिसरातील लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धोकादायक व वठलेली जुनी वडाची झाडे काढून घेण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार विटा ते गार्डी गावापर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पाहणी करून १५ धोकादायक झाडे काढण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार धोकादायक झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेऊन एका ठेकेदाराला काम देण्यात आले. परंतु, संबंधित ठेकेदाराने धोकादायक झाडे तशीच ठेवून साईडपट्ट्यांच्या आतील मोठी व फायद्याची झाडे तोडण्याचा सपाटा लावला. यावेळी ठेकेदाराने १५ पैकी दोन मोठी लिंबाची झाडे तोडली. हा प्रकार विटा येथील पर्यावरणप्रेमी अभय भंडारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन संंबंधित ठेकेदाराला याचा जाब विचारला. त्यानंतर त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत वृक्षतोड थांबविण्याची मागणी केली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विटा येथील उपअभियंता व्ही. व्ही. साखरे यांनी झाडे तोडण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले. (वार्ताहर)
राज्य शासन झाडे लावण्यासाठी मोठा खर्च करीत आहे. पण धोकादायक असल्याचे निमित्त करून जुनी ७० ते ८० वर्षांची झाडे तोडण्याचे पाप केले जाते. हे चुकीचे आहे. ठेकेदाराने तोडलेले एक झाड वाढण्यासाठी शंभर वर्षांचा कालावधी लागतो. परंतु, ती झाडे अवघ्या पंधरा मिनिटात जमीनदोस्त होत आहेत. यापुढे पर्यावरण राखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
- अभय भंडारी,
पर्यावरणप्रेमी, विटा
नागेवाडीपर्यंत ५० धोकादायक झाडे : साखरे
विटा ते माहुली रस्त्यावर दुतर्फा धोकादायक असलेली झाडे काढून घ्यावीत, अशी तक्रार लोकांनी सार्वजनिक बांधकामकडे केली होती. त्यामुळे केलेल्या पाहणीत नागेवाडीपर्यंत ५० धोकादायक झाडे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यातील १५ झाडे गार्डी गावापर्यंत आहेत. रस्त्याच्या नाल्याबाहेर व साईडपट्टीवरीलच धोकादायक झाडे व रस्त्यावर आलेल्या फांद्या कापून घेण्याचे काम सुरू होते. परंतु, आजच्या तक्रारीनंतर ते थांबविण्यात आले आहे, असे उपअभियंता
व्ही. व्ही. साखरे यांनी सांगितले.