Sangli: 'आता बदल हवा, आमदार नवा' या घोषवाक्याने राजकीय गोटात अस्वस्थता, जतमध्ये भिंती रंगवून प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:38 PM2024-08-23T17:38:40+5:302024-08-23T17:40:13+5:30

प्रचाराच्या घोषवाक्यांना बंदी नाही का ?

Slogans were painted on the walls in Jat taluka even before the assembly elections | Sangli: 'आता बदल हवा, आमदार नवा' या घोषवाक्याने राजकीय गोटात अस्वस्थता, जतमध्ये भिंती रंगवून प्रचार

Sangli: 'आता बदल हवा, आमदार नवा' या घोषवाक्याने राजकीय गोटात अस्वस्थता, जतमध्ये भिंती रंगवून प्रचार

जत : सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात जत शहर व तालुक्यात घोषवाक्यांनी भिंती रंगविल्या आहेत. 'आता बदल हवा, आमदार नवा', 'आपला माणूस, हक्काचा माणूस', 'आमचा पाणी प्रश्न सुटला, तर असे पोटासाठी फिरायची वेळ येणार नाही..' अशा घोषवाक्यांनी तालुक्यातील बसस्थानक, पिकअप शेडपासून ते शासकीय इमारतीच्या भिंती रंगवल्या आहेत. या घोषवाक्याने जत विधानसभेच्या राजकीय गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सध्या जत तालुक्यात काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजपचे पराभूत उमेदवार व माजी खासदार संजयकाका पाटील यांना केवळ जत विधानसभेत मताधिक्य मिळाले. त्यामुळे जत विधानसभेतून भाजप इच्छुकांची संख्या वाढली आहे.

त्यामध्ये आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभेत निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. पडळकरसमर्थक कार्यकर्त्यांनी ‘आता बदल हवा, जतला नवा आमदार हवा’ अशा घोषवाक्याने जत शहर व तालुक्यातील शासकीय इमारतीच्या भिंती रंगविल्या आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी जतमधून इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

उमेदवार स्थानिक की बाहेरचा ?

‘जतबाहेरचा उमेदवार पक्षाने देऊ नये, भुमिपुत्राला उमेदवारी द्यावी’, अशी थेट भूमिका भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी घेतली आहे. या भागातून भाजपकडून जगताप यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, तमनगौडा रवी-पाटील व डॉ. रवींद्र आरळी हे इच्छुक आहेत. पडळकर यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे.

प्रचाराच्या घोषवाक्यांना बंदी नाही का ?

तहसील कार्यालयाच्या भिंतीवर ठळकपणे दिसेल, असे इच्छुक उमेदवाराच्या नावासह घोषवाक्य रंगविले आहे. त्यावर प्रशासकीय यंत्रणा अथवा विद्यमान आमदार सावंत यांनी आक्षेप घेतला नाही. टी. एन. शेषन हे मुख्य निवडणूक अधिकारी असल्यापासून निवडणूक प्रचारासाठी भिंती रंगवण्यास बंदी आहे. मात्र, जतमध्ये निवडणुकीपूर्वीच भिंती रंगवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


माझे जत तालुक्याशी १५ वर्षांपासूनचे नाते आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही मला जतमधून ५६ हजार मते मिळाली होती. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मी जतमधून निवडणूक लढविण्यास तयार झालो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे घोषवाक्यांचे छाप भिंतीवर उठविले आहेत. - गोपीचंद पडळकर, आमदार, विधान परिषद, भाजप
 

जत तालुक्यातील भाजपमधून अनेकजण इच्छुक आहेत. त्यापैकी एकाला उमेदवारी देण्याची आमची भाजपकडे मागणी आहे. मात्र, तालुक्याबाहेरचा उमेदवार जतचे नागरिक स्वीकारणार नाहीत. त्यामुळे शासकीय इमारतींच्या भिंती प्रचारासाठी रंगविणे चुकीचे आहे. - विलासराव जगताप, माजी आमदार, भाजप.

गेल्या पाच वर्षांत जतमध्ये म्हैसाळ व टेंभू योजनेचे आणि कर्नाटक सरकारकडून तुबची - बबलेश्वरचे पाणी आणण्यासाठी आमदार म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे कोणी प्रचारासाठी भिंती रंगविल्या तरी काही फरक पडणार नाही. जतची जनता सर्वकाही ओळखून आहे. - विक्रम सावंत, आमदार, काँग्रेस.

Web Title: Slogans were painted on the walls in Jat taluka even before the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.