छोट्या बाबर टोळीचा पोलिसांवर हल्ला; सहाजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:10 AM2019-01-28T00:10:03+5:302019-01-28T00:10:08+5:30
सांगली : ‘मोक्का’ कायद्याखाली अटकेतील गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर यास न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याला भेटण्यास व मावा, गुटखा ...
सांगली : ‘मोक्का’ कायद्याखाली अटकेतील गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर यास न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याला भेटण्यास व मावा, गुटखा देण्यासाठी आलेल्या साथीदारांना पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर संतप्त झालेल्या साथीदारांनी पोलिसांच्या मोटारीवर जोरदार दगडफेक केली.
विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक ते धामणी रस्त्यावर भरदिवसा ही थरारक घटना घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अटक केलेल्यांमध्ये किरण श्रीरंग लोखंडे (वय २४), राहुल रमेश बाबर (२८, रा. विठ्ठलनगर, कोल्हापूर रस्ता), मेघ:श्याम ऊर्फ मोट्या अशोक जाधव (२५, गजानन कॉलनी, दत्त मंदिरजवळ, शामरावनगर,शुभम कुमार शिकलगार (२२, कुदळे प्लॉट, रमामातानगर), धनंजय शैलेश भोसले (२१, दत्त कॉलनी, शामरावनगर), सुजित सुनील कांबळे (२४, शामरावनगर, सांगली) यांचा समावेश आहे.
छोट्या बाबर हा सराईत गुन्हेगार आहे. खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी, दहशत माजविणे, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. गतवर्षी त्याच्यासह टोळीतील चौघांविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बाबर टोळीला कोल्हापुरातील कळंबा कारागृहात ठेवण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी छोट्याविरुद्ध दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी होती. यासाठी सांगली पोलीस मुख्यालयातील पथकाची छोट्या बाबरला न्यायालयात हजर करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
पथकाने कळंबा कारागृहातून छोट्या बाबरला ताब्यात घेतले. त्याला घेऊन पथक दुपारी सांगलीत दाखल झाले. छोट्याला न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या मोटारीत ठेवले होते. त्याच्या साथीदारांनी त्यास भेटण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला मावा, गुटखा, तंबाखूची पुडीही देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी संशयितांना फैलावर घेत तेथून हाकलून लावले. न्यायालयीन सुनावणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पथक छोट्याला घेऊन कळंब्याकडे रवाना झाले. विश्रामबागच्या स्फूर्ती चौकातून पथक पुढे आल्यानंतर धामणी रस्त्यावर छोट्याचे साथीदार दबा धरुन बसले होते. अचानक ते मोटारीच्या आडवे आले व त्यांनी मोटार थांबविण्याचा प्रयत्न केला. पण पथकाने मोटार न थांबविता भरधाव वेगाने नेली. त्यावेळी साथीदारांनी मोटारीवर जोरदार दगडफेक केली. पोलिसांनी दोन-तीन दिवसात दगडफेक करणाऱ्या संशयितांची नावे निष्पन्न केली. त्यानंतर संशयितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. पोलीस नाईक रवींद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे.