स्त्रियांच्या गुणोत्तर प्रमाणात अत्यल्प वाढ

By admin | Published: July 10, 2015 11:47 PM2015-07-10T23:47:03+5:302015-07-10T23:51:00+5:30

जिल्ह्याची स्थिती : चौदा वर्षांत हजार पुरुषांमागे ९६६ महिला; साक्षरतेतही पिछाडी

Small increase in the proportion of women | स्त्रियांच्या गुणोत्तर प्रमाणात अत्यल्प वाढ

स्त्रियांच्या गुणोत्तर प्रमाणात अत्यल्प वाढ

Next

अविनाश कोळी - सांगली -प्रबोधन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करूनही सांगली जिल्ह्यात गेल्या १४ वर्षात स्त्रियांच्या गुणोत्तर प्रमाणात केवळ १.१ टक्काच वाढ झाल्याची माहिती चालू आकडेवारीतून समोर आली आहे. २00१ मधील जनगणनेत १ हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९५७ इतकी होती. आता ही संख्या ९६६ झाली आहे. साक्षरतेच्या बाबतीतही पुरुषांपेक्षा महिला अजूनही खूप पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
पन्नास वर्षांपूर्वी २३.५ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर २०११ मध्ये ९.१८ टक्क्यांवर आला आहे. २0१५ मध्ये त्यात काहीअंशी भर पडली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्याची लोकसंख्या सध्या २८ लाख २२ हजार १४३ इतकी आहे. यात सर्वात चिंताजनक आकडेवारी स्त्री-पुरुष गुणोत्तराची आहे. विशेषत: गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील स्त्रियांची संख्या कमी आहे. ग्रामीण भागात २00१ मध्ये १ हजार पुरुषांमागे स्त्रियांंची संख्या ९६२ होती. २0११ मध्ये ही संख्या ९६५ वर गेली आहे. शहरातील स्त्रियांची संख्या २00१ मध्ये ९४३ होती. ती २0११ मध्ये ९६३ झाली आहे.
जिल्ह्यातील नागरीकरणाचा आढावा घेतला, तर १९९१ ते २00१ या दशकात १६.९ टक्क्यांनी नागरीकरण वाढले होते. २00१ ते २0११ या दशकात मात्र नागरीकरण वाढीचा वेग केवळ ९.२ टक्के इतकाच दिसून येत आहे. सध्या जिल्ह्याचा २५.५ टक्के भाग नागरी आहे.
१९६१ ते २००१ या चाळीस वर्षांच्या कालावधित जिल्ह्यातील शहरीकरण ८.९१ टक्क्यांनी वाढले आहे. तितक्याच प्रमाणात ग्रामिणीकरण घटल्याचे दिसून येते. पन्नास टक्के आरक्षणाची लढाई जिंकणाऱ्या महिलांच्या साक्षरतेचे प्रमाणही अजून समाधानकारक नाही. जिल्ह्यात २०११ पर्यंत साक्षरतेत अजूनही महिला पुरुषांच्या कितीतरी मागे असल्याचे दिसून येते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या साक्षरतेची टक्केवारी १५.७४ टक्क्यांनी कमी आहे.

ड्रेनेजची गंभीर स्थिती
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्राची स्वतंत्र माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार महापालिका क्षेत्रातील ३५.५ टक्के लोकवस्तीत उघड्या गटारी आहेत, तर २६.५ टक्के लोकवस्तीत ड्रेनेजच नाही. केवळ ३८ टक्के लोकवस्तीलाच बंदिस्त ड्रेनेजची सुविधा मिळाली आहे.


साक्षरता टक्केवारी
वर्ष पुरुष स्त्री

१९६१ ४१.८ १३.६
१९७१ ५0.९८ २३.८४
१९८१ ५९.६८ ३३.६५
१९९१ ७४.८३४९.९४
२00१८६.२६ ६६.७३
२0११ ९0.४0७४.६६

लोकसंख्या आकडे
१९६१ १२,३१,000
१९७१ १५,४0,000
१९८१ १८,३४000
१९९१ २२,0९,000
२00१ २५,८३,000
२0११ २८,२0,५७५
२0१५ २८,२२,१४३

मनपा क्षेत्रात २५.५ टक्के लोकसंख्या भाड्याच्या घरात
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात मालकीची घरे असणाऱ्यांची संख्या ७१ टक्के असून २५.५ टक्के लोक भाड्याच्या घरात राहत आहेत. झोपडपट्टी किंवा अतिक्रमण केलेल्या जागेत राहणाऱ्यांची संख्या ३.५ टक्के आहे.

Web Title: Small increase in the proportion of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.