जलव्यवस्थापनासाठी स्मार्ट दृष्टिकोन हवा
By admin | Published: March 5, 2017 11:30 PM2017-03-05T23:30:27+5:302017-03-05T23:30:27+5:30
बर्ट सॅटिजिन : वालचंदमधील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
सांगली : हवामानातील बदल आणि जलव्यवस्थापन यांचे जागतिक संदर्भ बदलत चालले आहेत. त्यासाठी स्मार्ट दृष्टिकोन तयार होणे गरजेचे आहे, असे मत नेदरलँड येथील तज्ज्ञ बर्ट सॅटिजिन यांनी वालचंद महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले. वालचंद महाविद्यालयातील दोनदिवसीय पर्यावरण व स्थापत्यविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप रविवारी झाला, यावेळी सॅटिजिन बोलत होते.
ते म्हणाले की, भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशात जलव्यवस्थापनाची समस्या अधिक गंभीर आहे. नेदरलँडला ओला दुष्काळ सतावत असताना, भारतासारख्या देशात दुष्काळाची स्थिती आहे. जागतिक तापमानवाढ, समुद्राच्या पातळीतील वाढ, रासायनिक वायूंचे वाढते उत्सर्जन... अशी अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. या प्रश्नांची उकल स्थापत्य अभियंते आपणास देऊ शकतात. दूरदृष्टी आणि धोरणात्मक नियोजन असायला हवे. आंतरराष्ट्रीय सहकार्यसुद्धा या नियोजनात महत्त्वाचे आहे.
नेदरलँडचे तज्ज्ञ थिस एडलकुर्ट म्हणाले की, आमच्या देशातील ‘अॅट्रेक्ट’ हे नव्याने विकसित होणारे शहर आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा वापर होतो. त्यामुळे कार्बन डायॉक्साईडसारख्या वायूंचे उत्सर्जन वाढत आहे. हे टाळण्यासाठी शहरात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी झिरपण्यासाठी, पावसाचे पाणी साठविण्यासाठी पुरेशी जागा आणि मजबूत रचना बनविली जात आहे. भारतीय शहरांमध्येही अशा उपायांची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
मुंबईचे उमेश धारगळकर म्हणाले की, भारत ही २०५० मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, मात्र त्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित पुरोगामी समाजाची गरज आहे. प्रमुख शहरांमध्ये वीज, पाणी, सांडपाणी व कचरा यासारख्या सुविधांचा पुनर्विकास केला पाहिजे.
परिषदेत रविवारी हैदराबाद येथील बी. उमाशंकर, बेंगलोरचे डॉ. के. आर. सुरेश, एस. रघुनाथ, विनोद होसूर या तज्ज्ञ संशोधकांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)