शासकीय सेवेचे ‘स्मित’व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 06:39 PM2018-10-11T18:39:36+5:302018-10-11T18:43:10+5:30

कोणतेही आव्हान असो अथवा संधी, तिथे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा कस लागतोच. तेच आव्हान प्रशासनातील असले आणि तीच संधी मानून काम केले, तर स्वत:चा त्या क्षेत्रातही प्रभाव अधोरेखित करता येतो, हे सिध्द करून दाखविले आहे सांगलीच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी.

"Smile" of government service | शासकीय सेवेचे ‘स्मित’व्रत

शासकीय सेवेचे ‘स्मित’व्रत

Next
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. मिळवत त्यांनी संशोधक वृत्ती जोपासली आहेपुणे, कोल्हापूर, मिरज प्रांताधिकारी, महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.

कोणतेही आव्हान असो अथवा संधी, तिथे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा कस लागतोच. तेच आव्हान प्रशासनातील असले आणि तीच संधी मानून काम केले, तर स्वत:चा त्या क्षेत्रातही प्रभाव अधोरेखित करता येतो, हे सिध्द करून दाखविले आहे सांगलीच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी. उपजिल्हाधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी असतानाही देशातील प्रतिथयश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. मिळवत त्यांनी संशोधक वृत्ती जोपासली आहे.

सध्या पुनर्वसन विभागाची जबाबदारी संभाळत असताना, येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हसतमुखपणे स्वागत करत प्रश्न समजावून घेत, त्याचे निराकरण करण्यात त्या व्यस्त असतात. स्मिता कुलकर्णी यांचे वडील आनंद दामले वारणानगर महाविद्यालयात, तर आई वर्षा दामले कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे तेथूनच अभ्यास करण्याची, व्यक्त होण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. वारणानगर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्याचे एस. पी. महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. एमबीबीएसची संधी थोडक्यात हुकल्याने विज्ञान शाखा सोडून त्यांनी थेट कलाशाखेत प्रवेश घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्णही झाल्या. ते वर्ष होते १९९६. पण रूजू होण्यास त्यांना दोन वर्षांचा कालावधी गेला आणि पुणे जिल्ह्यातील मावळ येथून तहसीलदार म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानंतर पुणे, कोल्हापूर, मिरज प्रांताधिकारी, महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.

‘यशदा’मध्ये प्रशिक्षण घेत असतानाच त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत असलेले त्रिगुण कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी २००२ ला प्रेमविवाह केला. कुलकर्णी सध्या सांगलीत निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पापरी (ता. मोहोळ) सारख्या ग्रामीण भागातून येऊन, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्रिगुण कुलकर्णी यांनी एमएस्सी (अ‍ॅग्री) शिक्षण पूर्ण केले, तसेच स्पर्धा परीक्षेतही यश मिळविले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असल्याचे स्मिता कुलकर्णी सांगतात.

दोघेही प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर असले तरी, त्यांचे कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष होत नाही. महिलांनी आपल्या क्षेत्रात जरूर कार्यरत रहावे; मात्र त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यालयात आल्यावर कामात मग्न असणाºया स्मिता कुलकर्णी घरी गेल्यानंतर मात्र उपजिल्हाधिकारी नसतात, तर असतात फक्त दुर्गा आणि यशच्या कुटुंबवत्सल आई. त्यांचा यश सध्या अकरावीत, तर दुर्गा चौथीमध्ये शिकत आहे. वरिष्ठ अधिकारी असतानाही कुलकर्णी दाम्पत्याने कधीही मुलांवर आपला विचार लादलेला नाही. उलट त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात.

मानसशास्त्राच्या अभ्यासाचा प्रशासनात स्मिता कुलकर्णी यांना फायदा झाला. प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी कामाच्या व्यस्ततेमुळे अस्वस्थ आहेत, त्यामुळे पुढे संधी मिळाली तर प्रशासनातील अधिकारी-कर्मचाºयांचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी प्रशिक्षण राबविण्याची त्यांना इच्छा आहे.

सतारवादनाचीही आवड
एनसीसीच्या कॅडेट राहिलेल्या कुलकर्णी ‘नेट’ही उत्तीर्ण झाल्या आहेत. आपल्याला ज्ञात असलेले शिकविणे व प्रशिक्षण देणे ही त्यांची ‘पॅशन’ आहे. अध्यापनाच्या आवडीमुळे त्यांनी अधिकाºयांचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या ‘यशदा’ संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. सतारवादनासह पुस्तक वाचनाची आवड त्यांनी जोपासली आहे.

शरद जाधव, सांगली.

Web Title: "Smile" of government service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.