कारखान्यांच्या धुराड्यातून संघर्षाचा धूर
By admin | Published: July 7, 2015 11:32 PM2015-07-07T23:32:16+5:302015-07-07T23:32:16+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँक : वसंतदादा-राजारामबापू साखर कारखान्यांचा वाद पेटला
अविनाश कोळी - सांगली -राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात नोंदली गेली असतानाच, या दोन्ही नेत्यांच्या नावाने उभारलेल्या साखर कारखान्यांचा संघर्षही आता नोंदला जाणार आहे. दोन्ही नेत्यांच्या वारसदारांनी एकमेकांच्या कारखान्यांना लक्ष्य केल्यामुळे राजकीय वादाचे धुराडे पेटले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या वादाला तोंड फुटले आहे. बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे धोरण बँकेतील सत्ताधारी गटाने घेतले आहे. या थकबाकीदारांमध्ये वसंतदादा साखर कारखान्याचाही समावेश आहे. वसंतदादा कारखान्यावरील कारवाई राजकीय हेतूने केली जात असल्याचे मत वसंतदादांचे नातू आणि कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केले आहे. वसंतदादा कारखान्यावरील कारवाईच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाच, विशाल पाटील यांनी थेट राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्यावर हल्लाबोल केला. नियम डावलून राजारामबापू कारखान्याला कर्ज दिल्याचा व राजारामबापूंचे पुत्र जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेला राजकीय अड्डा बनविल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केल्यामुळे दोन्ही कारखान्यांचा वाद विकोपाला गेला आहे.
वसंतदादा पाटील आणि राजारामबापू यांच्या वारसदारांमधील राजकीय संबंधही पूर्वीपासून बिघडलेलेच आहेत. जयंत पाटील आणि वसंतदादांचे नातू मदन पाटील यांनी आता जिल्हा बँकेच्या राजकारणात जुळवून घेतले असले तरी, हे मनोमीलन केवळ बँकेपुरतेच असल्याचे दोन्ही नेते सांगत आहेत. दुसरीकडे विशाल पाटील आणि जयंत पाटील यांचे सूर कधीच जुळले नाहीत. विशाल पाटील यांचे मोठे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि जयंतरावांमध्येही यापूर्वी संघर्ष झाला आहे.
राजकीय संघर्ष सुरू असताना कधी संस्थात्मक पातळीवर वाद निर्माण झाले नव्हते. जयंत पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेवर टीका करून या संघर्षाला सुरुवात केली होती. तरीही दादा गटाने यापूर्वी कधी जयंतरावांच्या संस्थांवर हल्लाबोल केला नव्हता. विशाल पाटील यांनी याची सुरुवात जिल्हा बँकेच्या मैदानातून केली. राजारामबापू कारखान्याच्या चारही युनिटला स्वतंत्रपणे मर्यादेपेक्षा जादा कर्जपुरवठा कसा केला गेला, याची माहिती त्यांनी जाहीर केली. अर्थात या गोष्टींचा इन्कार बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी केला असला तरी, संस्थात्मक पातळीवरील युद्ध आता खऱ्याअर्थाने पेटले आहे.
वसंतदादांच्या नावे स्थापन झालेल्या अनेक संस्था अडचणीत आल्या. सूतगिरणी, वसंत बझार यासारख्या संस्था बंद पडल्या तर वसंतदादा बँकेचा परवाना रद्द झाला. संस्थात्मक पातळीवर सांगलीत ही पडझड सुरू असतानाच इस्लामपूरमधील आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील संस्था सुस्थितीत आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक अधिक आक्रमक दिसत आहेत. जयंत पाटील यांनी वसंतदादा बँकेवर टीका करून या संस्थात्मक संघर्षाला सुरुवात केली होती. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असला तरी विशाल पाटील यांनी चिकाटी सोडलेली नाही. त्याचबरोबर त्यांनी राजकीयदृष्ट्याही आक्रमक भूमिका स्वीकारून राजारामबापू कारखान्यावर टीकास्त्र सोडले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी अनेक विषयांना विरोध केल्यामुळे या संघर्षाला अधिक धार आली आहे.
कारवाईनंतर वाद चिघळणार
वसंतदादा कारखान्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्हा बॅँकेतील दोन्ही गटांमधील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीतील शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. सध्या विरोधी सहा सदस्यांपैकी केवळ विशाल पाटीलच सत्ताधारी गटाविरोधात आक्रमक झाले आहे.
दादा गट एकाकी!
वसंतदादा गटातील विशाल पाटील व प्रतीक पाटील यांनी कदम गटाशी जुळवून घेतले असले, तरी प्रत्यक्षात बाजार समितीच्या निवडणुकीत या दोन्ही गटांत पुन्हा बिनसले आहे. जयंतरावांनी केलेल्या खेळीमुळे दादा गटाला धक्का बसला आहे. जयंतरावांनी थेट कदम गटालाच खेचण्यासाठी केलेली खेळी आता दादा गटाला अधिक अडचणीत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दादा गट एकाकी पडण्याच्या मार्गावर आहे.
अंतर्बाह्य संघर्ष
दादा गटाला सध्या अंतर्बाह्य संघर्ष करावा लागत आहे. मदन पाटील आणि विशाल पाटील वसंतदादांचे वारसदार असूनही सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत. दादा गटातच वाद असल्यामुळे त्यांना प्रथम अंतर्गत आणि नंतर बाहेरच्या नेत्यांशी संघर्ष करावा लागत आहे.