स्मृती मानधना अन् राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, सोशल मीडियावर अनोख्या योगायोगाची चर्चा
By अविनाश कोळी | Published: March 19, 2024 07:30 PM2024-03-19T19:30:48+5:302024-03-19T19:32:48+5:30
सांगली : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सांगली ते बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस गाडीला यंदा १३ मार्चला मुहूर्त मिळाला. त्यानंतर ...
सांगली : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सांगली ते बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस गाडीला यंदा १३ मार्चला मुहूर्त मिळाला. त्यानंतर चारच दिवसांनी १७ मार्चला सांगलीच्या स्मृती मानधनाने तिच्या नेतृत्वात बेंगलोरच्या टीमला पहिले डब्ल्यूपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. हा अनोखा योगायोग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यानिमित्ताने अनेक ऑफर्सही सांगलीकरांनी बेंगलोरवासीयांना दिल्या आहेत.
स्मृती मानधना ही सांगलीची कन्या असून वीमेन्स प्रीमिअर लीगमध्ये बेंगलोरचे नेतृत्व ती करीत होती. सांगली व बेंगलोरचे नाते त्यामुळे दृढ झाले आहे. दुसऱ्या बाजूस सांगली ते बंगळुरू चेन्नम्मा एक्स्प्रेसची सांगलीकरांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. १३ मार्चला मध्य रेल्वेने सांगली स्थानकातून बेंगलोरची एक्स्प्रेस सोडली. या रेल्वेचे उत्साही स्वागत सांगलीकरांनी केले.
त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी मुंबईला हरवून स्मृती मानधनाची बेंगलोर टीम फायनलमध्ये पोहोचली. १७ मार्चला विजेतेपदही पटकाविले. त्याचा आनंदही सांगलीकरांनी साजरा केला. बेंगलोरवासीयांनी आता स्मृती मानधनाच्या सांगलीत येऊन आनंद साजरा करावा, असे आवाहन सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर केले. त्यावर लाइक्सचा पाऊस पडत आहे.