फेसबुक लाईव्ह करून मारला साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:26+5:302021-03-05T04:27:26+5:30
फेसबुक लाईव्ह करीत कबीर वाघमारे याने काहीजणांच्या मदतीने घोणस जातीच्या सापाला काठीने अतिशय क्रूर पद्धतीने मारून ‘मी मारलाय हा ...
फेसबुक लाईव्ह करीत कबीर वाघमारे याने काहीजणांच्या मदतीने घोणस जातीच्या सापाला काठीने अतिशय क्रूर पद्धतीने मारून ‘मी मारलाय हा साप आता जस्ट' अशी टॅगलाईन देत फेसबुक अकाैंटवर पोस्ट केली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सांगलीतील प्राणीमित्र अॅड. बसवराज होसगौडर यांना याबाबत कबीर वाघमारे याच्याविरुद्ध वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये तक्रार केली.
या तक्रारीची दखल घेऊन पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या आदेशाने कबीर वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून सायबर सेलकडे तपासासाठी पाठवण्यात आले आहे. आरोपी वाघमारे याचा शोध सुरू असून, त्यास अटक करण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.
चाैकट
साप मारणे गुन्हा
कोणताही साप मारणे कायद्याने गुन्हा असून, तीन ते सात वर्षे शिक्षा व १० ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आहे. प्रसिद्धीसाठी काही लोक फेसबुकवर वन्यप्राण्यांसोबत फोटो, व्हिडीओ काढून स्टंट करीत आहेत. वन्य प्राणी पकडणे, हाताळणे गुन्हा असल्याने संबंधितांवर वन विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.