Sangli: मिरजेतील स्नेहा ठरली कुंकुंवाले समाजातील पहिली एमबीबीएस डॉक्टर

By संतोष भिसे | Published: April 1, 2024 06:11 PM2024-04-01T18:11:13+5:302024-04-01T18:11:38+5:30

घर विकून उभारला डॉक्टरकीसाठी पैसा, लेकीच्या स्वप्नांना वडिलांनी दिले पंख 

Sneha Chandanwale, the first girl from the Kunkuwale community to become a doctor | Sangli: मिरजेतील स्नेहा ठरली कुंकुंवाले समाजातील पहिली एमबीबीएस डॉक्टर

Sangli: मिरजेतील स्नेहा ठरली कुंकुंवाले समाजातील पहिली एमबीबीएस डॉक्टर

सांगली : वडिलांचा व्यवसाय स्टेशनरी विकण्याचा. मिळकत जेमतेमच, पण मुलांना शिकविण्याची जिद्द भारी. पोरीला चांगल्या गुणवत्तेमुळे एमबीबीएसला प्रवेश मिळाला, पण पुढील खर्च आवाक्याबाहेरचा होता. त्यासाठी त्यांनी राहते घर विकले, पण परिस्थितीला स्नेहाच्या डॉक्टरकीच्या आड येऊ दिले नाही.

राज्यात कुंकुवाले समाजातील पहिली मुलगी डॉक्टर ठरलेल्या स्नेहा चंदनवाले आणि तिचे वडील यल्लाप्पा यांच्या जिद्दीची ही कथा. मिरजेत मंगळवार पेठेत विश्वश्री चौकात चंदनवाले कुटुंब भाड्याच्या घरात राहते. दोन मुली, एक मुलगा असा चंदनवाले दांपत्याचा संसार. थोरल्या स्नेहाने बारावीला ७८ टक्के गुण मिळविल्यानंतर नीटमध्येही बाजी मारली. चांगल्या गुणांमुळे मुंबईच्या कुपर वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय शुल्कात प्रवेश मिळाला. प्रवेशाला फार पैशांची गरज नसली, तरी पुढील शिक्षण, मुंबईत राहणे हा खर्च मोठा होता.

हातावरचे पोट असलेल्या यल्लाप्पा यांनी हार मानली नाही. दैवाने लेकीच्या पदरात टाकलेले दान व्यर्थ जाऊ नये यासाठी कंबर कसली. राहते घर विकले. स्नेहाच्या डॉक्टरकीसाठी पैसा उभा केला. तिनेही वडिलांच्या आकांक्षा संपूर्ण सुफळ केल्या. चांगल्या गुणांसह एमबीबीएस उत्तीर्ण झाली. कुंकुवाले समाजात एमबीबीएस डॉक्टर झालेली ती पहिलीच मुलगी असल्याचा दावा यल्लाप्पा यांनी केला. आता स्नेहाला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे. आहे. त्यासाठीही मागे हटणार नसल्याचे ते सांगतात. 

थोरल्या स्नेहाच्या पावलावर पाऊल टाकत धाकटी श्रुतीदेखील दंतवैद्य होत आहे. बुधगाव येथे डेन्टल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत आहे. मुलगा अकरावीत आहे. तिघांच्या शिक्षणाचा खर्च मोठा असला, तरी शिक्षणाशिवाय कुटुंबाला भविष्य नाही हे यल्लाप्पा यांच्या लक्षात आले आहे. 

जिजाऊ ट्रस्टतर्फे गाैरव

मिरजेत जिजाऊ चॅरीटेबल ट्रस्टने रविवारी स्नेहा आणि यल्लाप्पा यांच्यासह चंदनवाले कुटुंबाचा सत्कार केला. भाड्याचे घर इतके छोटे, की सत्कारासाठी आलेल्या पाहुण्यांना बसायलादेखील पुरेशी जागा नव्हती. पण या छोट्या कुटुंबानेच आभाळाएवढे यश मिळविल्याचा गौरव ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, धनंजय सातपुते आदी उपस्थित होते.

Web Title: Sneha Chandanwale, the first girl from the Kunkuwale community to become a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.