..तर महायुतीकडे मिळाली असती लाल दिव्याची गाडी - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 05:03 PM2024-08-09T17:03:18+5:302024-08-09T17:03:36+5:30
आष्ट्यात बुथ कमिटीच्या बैठका
आष्टा : मी महायुतीकडे गेलो असतो तर मलाही लाल दिव्याची गाडी मिळाली असती. मात्र, मी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहिलो. महाराष्ट्रात शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना स्थान आहे. वाळवा तालुका क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. इतरांसारखे कोणाच्या वळचणीला जाण्यापेक्षा लढत राहायचे ठरवले आहे. वाळवा तालुक्यातील जनतेचा कौल लढणाऱ्याच्या पाठीशी राहिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर, बाजारवाडी, चांदोली वसाहत, मिरज वेस, चव्हाणवाडी, अंबाबाई मंदिरानजीक, बसुगडे मळा, साठेनगर, खोतमळा, तासगाव रस्ता, रामनगर, तक्क्या, महात्मा गांधी हाउसिंग सोसायटी यासह विविध ठिकाणी आयोजित बुथ कमिटीच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
जयंत पाटील म्हणाले, लोकसभेला जनतेने महायुतीला साथ दिली. भाजप देशात ‘४०० पार’च्या घोषणा देत असताना त्यांना जनतेने २४० वरच ठेवले. त्यांना दोन पक्षांचा टेकू घ्यावा लागला. जनतेला फोडाफोडी करणारे महायुतीचे सरकार पसंत नाही. विधानसभेलाही जनताच अशा राजकारणाला आपल्या मतांद्वारे उत्तर देईल.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, राजारामबापू कारखान्याचे संचालक रघुनाथ जाधव, बबन थोटे, विराज शिंदे, माणिक शेळके, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, विजय मोरे, समीर गायकवाड, शिवाजी चोरमुले, अर्जुन माने, पी. एल. घस्ते, प्रकाश पवार, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले स्मिता सोलनकर, सोनल शिराळकर व प्रा. संजय मगदूम यांचा सत्कार करण्यात आला.