... म्हणून शिवसेना मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळ्यात 'हे' शेतकरी दाम्पत्य स्टेजवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 11:53 AM2019-11-16T11:53:54+5:302019-11-16T11:58:56+5:30
उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यात जत येथील संजय सावंत आणि रुपाली सावंत या शेतकरी दाम्पत्याला भेट देत
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीसांगली जिल्ह्याचा दौरा करुन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. सांगलीतील फळबागायतदारांच्या बांधावर जाऊन उद्धव यांनी पिकांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी, जिल्ह्यातील विटा येथे उद्धव ठाकरेंना वेगळाच अनुभव पाहायला मिळाला. विटा तालुक्यातील जत येथील शेतकरी दाम्पत्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी 5 दिवस निरंकार उपवास करत देवाचा धावा केला.
उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यात जत येथील संजय सावंत आणि रुपाली सावंत या शेतकरी दाम्पत्याला भेट देत, त्यांचे आभार मानले. या दाम्पत्याने 5 दिवस निरंकार उपवास करत, 85 किलोमीटरचा प्रवास अनवाणी करून पंढरीच्या विठुरायाकडे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी प्रार्थना केली आहे. विट्यातील कराड रस्त्यालगतच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळी, सावंत दाम्पत्याने त्यांची भेट घेतली. यावेळी, शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना, आम्हाला एका कोपऱ्यात उभारण्याची संधी द्यावी अशी इच्छा या दाम्पत्याने व्यक्त केली. त्यावर, उद्धव ठाकरेंनी लगेच होकार देत, तुमचा संपर्क नंबर द्या, शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना या सोहळ्यात मी तुम्हाला स्टेजवर स्थान देतो, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी या शेतकरी दाम्पत्यास दिले. उद्धव यांच्या या आश्वासनाने उपस्थित सर्वचजण भारावून गेल्याचं पाहायला मिळालं.