देवाप्पा मुळीक ट्रस्टने जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:09+5:302021-04-27T04:27:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोना महामारीच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणारे आरोग्य, महसूल, अंगणवाडी, आशा स्वयंसेविका, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोना महामारीच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणारे आरोग्य, महसूल, अंगणवाडी, आशा स्वयंसेविका, सफाई कर्मचाऱ्यांना एक हजार आरोग्य कीटचे वाटप करीत रेवणगाव (विटा) येथील अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या कै. देवाप्पा मुळीक चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ रविवारी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या हस्ते विटा येथे करण्यात आला.
या कोविड योद्ध्यांच्या सुरक्षितेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या कै. देवाप्पा मुळीक ट्रस्टने साबण, सॅनिटायझर, मास्क यासह अन्य साहित्य देण्याचा संकल्प केला आहे. विटा शहरासह तालुक्यात सुमारे एक हजाराहून अधिक आरोग्य कीट देण्यात येणार आहेत.
अॅड. मुळीक म्हणाले, ह.भ.प. कै. देवाप्पा मुळीक यांनी त्यांच्या स्वत:च्या कष्टातून मिळालेल्या कमाईतून काही रक्कम सामाजिक कार्यात खर्च करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या नावे ट्रस्टची स्थापना करून कोरोना योद्ध्यांना आरोग्य कीटचे वाटप करीत असल्याचे सांगितले.
प्रांताधिकारी संतोष भोर यांनी अॅड. मुळीक यांचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत कोविड योद्ध्यांना प्रोत्साहन मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमास विश्वस्त अॅड. वैभव माने, अॅड. स्वप्नाली माने, अॅड. संदीप मुळीक, अभियंता सागर मुळीक, सुभाष मुळीक, निलेश मुळीक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.