नगरसेवकांची सोशल धुळवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:34+5:302021-09-24T04:30:34+5:30
नगरसेवकांची सोशल धुळवड मिरजेत नगरसेविका संगीता हारगे व योगेंद्र थोरात यांच्यातील संघर्ष इरेला पोहोचलाय. दोघंही राष्ट्रवादीचे, पण प्रत्येक विकासकामांवरून ...
नगरसेवकांची सोशल धुळवड
मिरजेत नगरसेविका संगीता हारगे व योगेंद्र थोरात यांच्यातील संघर्ष इरेला पोहोचलाय. दोघंही राष्ट्रवादीचे, पण प्रत्येक विकासकामांवरून ते आमनेसामने येताहेत. कामांची पळवापळवी सुरू आहे. अगदी पक्षश्रेष्ठींपर्यंतही संघर्ष पोहोचलाय, पण तोडगा निघालेला नाही. प्रभागातील मतदारांचे व्हॉटसॲप ग्रुप तयार केलेत. त्यावर दररोज दोघांची सोशल धुळवड पाहायला मिळतेय. अर्थात, या संघर्षात अनेक विकासकामे मार्गी लागलीत. नगरसेवकांची मिलीभगत झाली की मतदारराजाला वाऱ्यावर सोडलं जातं, इथं मात्र मतदारांची चांदी झालीय!
जसा नेता तसाच चेला
सांगलीत एका प्रभागात भावी नगरसेवकांची बैठक रंगात आली होती. नव्या प्रभाग रचनेमुळं कुणाला संधी मिळणार, कुणाचा पत्ता कट होणार, यावर विचारमंथन सुरू होतं. पक्षनेत्यांना मात्र वेगळीच चिंता सतावत होती, इच्छुकांपैकी थांबवायचं कुणाला आणि कसं? यादरम्यान एकजण म्हणाला, ‘साहेब नवी प्रभागरचना थांबली पाहिजे’. नेत्यांनी गुगली टाकली, ‘मग उपोषणाला बसा, आत्मदहनाचा इशारा द्या’. अर्थात, तो भावी नगरसेवकदेखील त्यांचाच चेला होता, म्हणाला, ‘मी आत्मदहन करतो, म्हणजे माझा पत्ता आपोआपच कट होईल. भारी गेम करताय राव!’.