हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतींना अंनिसतर्फे 'सामाजिक प्रेरणा पुरस्कार'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:22 PM2022-05-17T14:22:34+5:302022-05-17T14:23:06+5:30
३१ मेरोजी हेरवाड व माणगामध्येच पुरस्काराचे वितरण केले जाणार
सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींनी विधवांच्या अवहेलनेची प्रथा बंद करण्याचा ठराव केला. त्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर केला आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि मानपत्र असे त्याचे स्वरुप आहे. ३१ मेरोजी हेरवाड व माणगामध्येच पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ ठाणे येथील कमल विचारे यांनी दिलेल्या देणगीतून पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराची कल्पना सुचविणारे महात्मा फुले सामाजिक सेवा मंडळाचे प्रमोद झिंजाडे, करमाळा यांचाही सत्कार होईल. अंनिसच्या अध्यक्षा सरोजमाई पाटील, डॉ. शैला दाभोलकर व अभिनेते किरण माने यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीतर्फे ही माहिती देण्यात आली.
पुरस्कार सोहळ्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात, फारुख गवंडी, डॉ. संजय निटवे, गीता ठकार, सुनील भिंगे, वाघेश साळुंखे, प्रा. एस. के. माने, रवी सांगोलकर यांनी केले आहे.