कोविड सेंटरसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:28+5:302021-05-29T04:20:28+5:30
सांगली : सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह ...
सांगली : सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह अलगीकरण बंद केल्यामुळे प्रत्येक गावात व शहरात प्रभागनिहाय कोविड सेंटर उभारण्याची गरज असून, त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले की, कोरोनाबाधितांपैकी ८० टक्के रूग्णांना कोणतीही लक्षणे नसतात. या रूग्णांना घरात ठेवता येत नाही शिवाय त्यांना रूग्णालयातही दाखल करण्याची गरज नसते. पण हे रूग्ण घरीच राहिल्याने संसर्गाचा धोका वाढतो आहे. संपूर्ण कुंटुंब बाधित होत आहे. दाट वस्तीमध्ये संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यासाठी कोविड केअर सेंटरची गरज आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांनी विविध तपासणीही वेळेवर करण्याची गरज आहे. अशा रूग्णांसाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेऊन वसतिगृह, हॉटेल्स, धर्मशाळा, शाळा, महाविद्यालयांच्या वापरात नसलेल्या इमारतीत आयसोलेशनची सोय केली जाऊ शकते. यासाठी भारतीय जैन संघटनेने एक कार्यप्रणाली विकसित केली आहे. त्यामध्ये डॉक्टर तपासणी, औषधे याचा संपूर्ण दिवसभराचा प्रोटोकॉल तयार केला आहे. यासाठी सर्व मार्गदर्शन भारतीय जैन संघटना करण्यास तयार आहे.
तसेच गावातील, शहरातील पतसंस्था, सहकारी बॅंका, विविध सोसायट्या, दूध संघ, क्रीडामंडळे, सामाजिक, शैक्षणिक संस्था आदींनी पुढाकार घेऊन आयसोलेशन कोविड सेंटर गावामध्ये व महानगरपालिका क्षेत्रामध्ये तयार केले पाहिजे. तरच कोरोनाची साखळी खंडित होण्यास मदत होणार आहे. याविषयी पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदनही दिल्याचे पाटील यांनी सांगितले.