सोसायट्यांना राज्य बॅँकेकडूनही कर्ज
By admin | Published: October 2, 2016 01:01 AM2016-10-02T01:01:15+5:302016-10-02T01:01:15+5:30
सुभाष देशमुख : वसुलीसाठी खासगी यंत्रणा उभारण्याचाही शासनाचा विचार
सांगली : सोसायट्यांना राज्य बॅँकांचेही सभासदत्व देऊन प्रसंगी त्यांना आवश्यक असलेला जादाचा कर्जपुरवठा राज्य बॅँकेकडूनही करता येईल. वसुलीसाठी एजंट, मानधनावरील लोक नेमण्याचाही विचार सुरू आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी जिल्हा बँकेतील सत्कार कार्यक्रमात दिली.
जिल्हा बँकेच्या सभागृहात देशमुख यांचा सत्कार झाला. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, गावाच्या समृद्धीसाठी सोसायट्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे सोसायट्यांचे सक्षमीकरण करण्याचा विचार पुढे आला आहे. गावातील पैसा गावातच राहिला पाहिजे. त्यामुळे गावातून बाहेर जाणारा रुपया आणि गावात येणारा रुपया यांचा अभ्यास करून गावातला रुपया गावातच राहताना बाहेरून जास्तीत जास्त पैसे गावात कसे येतील, याचा विचार करण्याची गरज आहे. सहकारी संस्था म्हणून सोसायट्यांनी आता पारंपरिक चाकोरी तोडून नावीन्यपूर्ण योजना आत्मसात केल्या पाहिजेत. विविध वस्तूंचे उत्पादन गावपातळीवरचझाले पाहिजे. त्यासाठी सोसायट्यांना हवा असलेला जादाचा कर्जपुरवठा थेट राज्य बँकेमार्फतही होऊ शकतो. त्यादृष्टीने सोसायट्यांना सभासद करून घेण्यात येईल. प्रत्येक खातेदार हा सभासद झाला पाहिजे. त्याची मोहीमही सुरू झाली आहे
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील म्हणाले की, प्रशासकांकडून जिल्हा बँक लोकनियुक्त संचालक मंडळाच्या ताब्यात आली, तेव्हा अनेक शंका-कुशंका उपस्थित होत होत्या. तरीही मंडळाने लोकांचा विश्वास जिंकताना बँकेची आर्थिक प्रगती केली. जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर प्रास्ताविक केले.
यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक, बॅँकेचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक बी. एम. रामदुर्ग, व्यवस्थापक मानसिंग पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दिलीपतात्यांचे मार्गदर्शन हवे
४सहकाराचे शुद्धीकरण करताना संस्थांच्या आर्थिक प्रगतीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची गरज आहे. वस्त्रोद्योग आणि बँकिंग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या दिलीपतात्या पाटील यांच्याही मार्गदर्शनाची भविष्यात गरज मला लागेल. जिल्हा बँकेची त्यांच्या नेतृत्वाखाली जी वाटचाल सुरू आहे, ती पाहता लवकरच ही बँक राज्यातील क्रमांक एकची सक्षम बँक ठरेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
४सध्या महाराष्ट्रात १३० सूतगिरण्या आहेत. यातील ५६ चालू स्थितीत असून, केवळ चार ते पाचच संस्था नफ्यात आहेत. राज्यातील सूतगिरण्यांच्या वस्तुस्थितीची आकडेवारी माझ्याकडे आहे. त्यामुळे सूतगिरण्यांचे नेतृत्व करणाऱ्या दिलीपतात्यांना अपेक्षित असलेली मदत आम्ही लवकरच करू, असे आश्वासन देशमुख यांनी यावेळी दिले.
प्रसंगी ‘आॅपरेशन’
महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांनी मला सहकाराच्या शुद्धीकरणासाठी ताकीद दिली आहे. सहकाराला जडलेला आजार दूर करण्यासाठी औषधोपचार करण्याचे काम आता सुरू केले आहे. औषधांनी उपचार होत नसतील, तर प्रसंगी ‘आॅपरेशन’सुद्धा करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत शुद्धीकरण करून सहकाराबद्दलचे नकारात्मक चित्र नाहीसे करण्याचे काम आम्ही करू, असे देशमुख म्हणाले.