सोसायटी निवडणुकांचे तासगावकरांना वेध...

By admin | Published: November 7, 2014 11:07 PM2014-11-07T23:07:36+5:302014-11-07T23:34:39+5:30

मोर्चेबांधणीस वेग : आबा-काका गटात पुन्हा संघर्ष

Society elections | सोसायटी निवडणुकांचे तासगावकरांना वेध...

सोसायटी निवडणुकांचे तासगावकरांना वेध...

Next

अमित काळे - तासगाव --विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत असतानाच, सहकाराच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर राजकारणातील सत्ताकेंद्र असणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचे वेध तालुक्याला लागले आहेत. डिसेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात काही सोसायट्यांच्या निवडणुका उरकल्या जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ. आर. आर. पाटील यांनी या निवडणुकांबाबत नुकतीच काही ठराविक कार्यकर्त्यांशी चर्चाही केली.
तासगाव तालुक्यात सध्या निवडणूक होणाऱ्या ३७ विकास सोसायट्या आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत त्यातल्या पहिल्या टप्प्यात २0 विकास सोसायट्यांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे, तर उर्वरित १७ सोसायट्यांच्या निवडणुका डिसेंबरनंतर दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कार्यकर्ते या प्रक्रियेमध्ये सामीलही झाले आहेत. निवडणुकांबाबत अद्याप अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी, लवकरच निवडणुका होणार हे निश्चित मानले जात आहे.
स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत व विकास सोसायटी या दोन प्रमुख संस्था ताब्यात घेण्यासाठी राजकीय धुरीण डाव—प्रतिडाव करीत असतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावगाडा, तर विकास सोसायट्यांच्या माध्यमातून आर्थिक नाड्या हातात ठेवण्यासाठी राजकीय गटांचे प्रमुख या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावत असतात. विकास सोसायटी सर्वसामान्य, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून शासनाने जाहीर केलेल्या योजना, कर्जाबाबतची घेतलेली धोरणे राबविली जात असतात.
एका बाजूला सामान्याला भांडवल उपलब्ध करून देणारी ही संस्था असली तरी, त्यावर ताबा मिळवून त्यातून आपला राजकीय गट जिवंत ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांची धडपड सुरू असते. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुका होणाऱ्या गावात मोर्चेबांधणीस सुरुवातही झालेली आहे.
नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली आहे. तासगाव— कवठेमहांकाळ मतदारसंघ लक्षवेधी ठरला असल्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. कुणी कुणाचे काम केले, यावर सोसायट्यांचे पॅनेल ठरेल व पुढे निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात आ. आर. आर. पाटील व खा. संजयकाका पाटील यांचेच तुल्यबळ गट आहेत. हे दोन्ही नेते नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रथमच सोसायट्यांच्या निवडणुका होत आहेत.
कुठल्या कुठल्या गावातील सोसायट्यांच्या निवडणुका आहेत, याची माहिती राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडून घेतली आहे. नेत्यांच्या कानावरही हा विषय घालण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, त्याची तयारी सुरू आहे.

तासगाव तालुक्यात सध्या माजी गृहमंत्री आ. आर. आर. पाटील व खा. संजयकाका पाटील यांचेच तुल्यबळ गट आहेत. विशेष म्हणजे आता दोन्ही गटांचे नेते निवडणुकीत विजयी झाल्यामुळे पदांवर आहेत. तालुक्यात सध्या ३७ विकास सोसायट्यांंच्या निवडणुका होणार आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत त्यातल्या पहिल्या टप्प्यात २0 विकास सोसायट्यांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे, तर उर्वरित १७ सोसायट्यांच्या निवडणुका डिसेंबरनंतर दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याने आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे.

Web Title: Society elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.