क्रांतिसिंहांच्या विचारांची आज समाजाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:14+5:302020-12-08T04:23:14+5:30
विटा : आजची राजकीय परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. जो कोणी व्यवस्थेच्या विरोधात बोलेल, त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. डॉ. ...
विटा : आजची राजकीय परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. जो कोणी व्यवस्थेच्या विरोधात बोलेल, त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला बोलण्याचा हक्क दिला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सामान्य माणसाला आवाज दिला आहे. ही त्यांची देणगी आहे. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांची खरी गरज आहे, असे मत विटा येथील बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. मोरे यांनी व्यक्त केले.
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिसिंह विश्वस्त मंडळाच्या मोफत वाचनालयातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रांतिवीरांगणा श्रीमती हौसाताई पाटील, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, संपतराव पवार, ‘रयत’चे विभागीय अध्यक्ष माधवराव मोहिते, अॅड. सुभाष पाटील, सुभाष पवार उपस्थित होते.
प्रा. डॉ. शिंदे यांनी क्रांतिसिंहांच्या जीवनावर एकपात्री नाट्यप्रयोग सादर केले. अॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत केले. कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट काम करणारे डॉ. इनामदार, डॉ. हुलवान, डॉ. कु. सकटे यांचा कोविड योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रा. संजय ठिगळे, प्रा. विलासराव पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड, प्रा. पांडुरंग शितोळे, यशवंतराव महाडिक, राजाभाऊ शिरगुप्पे, संग्राम सावंत, मारूतीराव शिरतोडे, शिवाजीराव शितोळे आदी उपस्थित होते. इंद्रजित पाटील यांनी आभार मानले.
फोटो - ०७१२२०२०-विटा-हणमंतवडिये : कडेगाव तालुक्यातील हणमंतवडिये येथे क्रांतिसिंह नाना पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अॅड. सुभाष पाटील, संपतराव पवार, माधवराव मोहिते, प्राचार्य डॉ. आर. एस. मोरे, प्रा. नवनाथ शिंदे उपस्थित होते.