सलगरेत लाचखोर तलाठ्यास अटक
By Admin | Published: February 4, 2016 01:13 AM2016-02-04T01:13:22+5:302016-02-04T01:16:35+5:30
रंगेहात पकडून अटक
मिरज : शेतजमिनीच्या नोंदीसाठी पाच हजार रुपये लाच घेताना सलगरे (ता. मिरज) येथील तलाठी प्रवीणकुमार संभाजी जाधव (वय ३९, रा. खतीबनगर, मिरज) यास सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी सलगरेतील तलाठी कार्यालयात रंगेहात पकडून अटक केली.
सलगरे हद्दीत शेतजमीन खरेदी केलेल्या तक्रारदाराने खरेदी नोंदीची फेरफार रजिस्टरला नोंद करण्यासाठी अर्ज करून सात-बारा उताऱ्याची मागणी तलाठी प्रवीणकुमार जाधव याच्याकडे केली होती. तलाठी जाधव याने फेरफार नोंद करून सात-बारा उतारा देण्यासाठी साडेबारा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रदीप आफळे, निरीक्षक सुनील गिड्डे यांच्यासह पथकाने सलगरे येथे तलाठी कार्यालयात सापळा लावला. तलाठी जाधव याने तक्रारदाराकडे साडेबारा हजार रुपये लाचेची मागणी करून, त्यापैकी जमेल तेवढी रक्कम लगेच आणून देण्यास सांगितले. तक्रारदाराने साडेबारा हजारऐवजी पाच हजार देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार बुधवारी दुपारी पाच हजार रुपये लाच घेतल्यानंतर तलाठी जाधव यास ताब्यात घेऊन लाचेची रक्कम हस्तगत केली. जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (वार्ताहर)