शौर्यपदकधारक सैनिकांना मालमत्ता करातून सूट देणार : सांगली महासभेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:46 AM2018-03-09T00:46:20+5:302018-03-09T00:46:57+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रातील सरंक्षण दलातील शौर्यपदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे चर्चेला आणला आहे. संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांनाही
सांगली : महापालिका क्षेत्रातील सरंक्षण दलातील शौर्यपदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सूट देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे चर्चेला आणला आहे. संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांनाही मालमत्ता करातून सूट देण्याचाही विषय महासभेपुढे आणला आहे महापालिकेची महासभा १९ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. मागची महासभा आरक्षित जागेवरील घर नियमित करण्यासाठी अनेक सदस्यांच्या उपसूचनेद्वारे आरक्षणे रद्द करण्याच्या विषयावरून वादळी ठरली होती. यावेळी महापौर शिकलगार यांनी महासभाच गुंडाळली होती. महासभेनंतर उपसूचनेवरून आंदोलने झाली. महापौरांनी उपसूचनेव्दारे आलेले सर्व प्रस्ताव रद्द केले. प्रत्यक्ष पाहणी करून विषयपत्रिकेवर घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका महापौरांनी घेतल्याने यावर तात्पुरता पडदा पडला.
मागील इतिवृत्त मंजुरीवरून येत्या महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. या महासभेत मिरजेतील ७६३.८० चौरसमीटर इतका खुला भूखंड विकसित करण्यासाठी मोफत मागणी केल्याचा विषय महासभेपुढे आणला आहे. मात्र, प्रशासनाने विषयपत्र देताना भाड्याने देण्याचा विषय आणला आहे.
मुळात महापालिकेच्या मालकीची कोणतीही जागा मोफत देण्याची तरतूदच कायद्यात नाही, असे असताना प्रशासनाने असा विषय आणल्याने सत्ताधारी अडचणीत आले आहेत. यावर वादळी चर्चा होईल, अशी शक्यता आहे.
यावेळी गतवेळी शिल्लक राहिलेल्या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभा वादळी होणार आहे.
चौकाचे बाळासाहेब ठाकरे नामकरण
कोल्हापूर रस्त्यावरील जमिनीमधील भोबे गटार जोडण्यासाठी जावेद शेख यांची जागा ताब्यात घेऊन महापालिका मालकीची पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे आला आहे. याचबरोबर स्टेशन चौकास हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, असे नामरकण करण्याचा प्रस्तावही चर्चेला आणला आहे. महापालिकेची महासभा १९ मार्चला सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येणार असून, ही सभा वादळी होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या महासभेमध्ये ऐनवेळचे विषयही चर्चेत येणार आहेत.