राज्य शिक्षण महामंडळाच्या माध्यमातून समस्या सोडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:30+5:302021-03-19T04:25:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : खासगी शिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा शिक्षण संस्था संघ आणि महामंडळाचे संघटन मजबूत करणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : खासगी शिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा शिक्षण संस्था संघ आणि महामंडळाचे संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी वाळवा तालुक्यातील सर्व संस्थांनी संघाचे आजीवन सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणारी बैठक झाली. कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस वाळवा तालुक्यातील ४५ शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्राचार्य सावंत म्हणाले, खासगी शिक्षण संस्थांनी शैक्षणिक विकासामध्ये मोठी कामगिरी केली आहे. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देताना कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा पुढे चालविला आहे. शिक्षण संस्था संघटनेचे संघटन भक्कम करण्यासाठी वाळवा तालुक्यातील शिक्षण संस्था सर्व ती मदत करतील.
महामंडळाचे उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी महामंडळाच्या ५० वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला. शिवाजी माळकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील यांनी स्वागत केले. यावेळी एस. के. पाटील, आर. एस. चोपडे, विनोद पाटोळे, एम. एस. रजपूत, नितीन खाडिलकर उपस्थित होते.