Sangli: म्हैसाळ योजनेचे पाणी अन् विजेचा प्रश्न निकाली काढा, डफळापुरात सांगली मार्ग रोखला; दोन तास वाहतूक ठप्प
By श्रीनिवास नागे | Published: July 19, 2023 03:43 PM2023-07-19T15:43:29+5:302023-07-19T15:44:17+5:30
जत : म्हैसाळ योजनेचे पाणी डफळापुर भागात सोडावे व विजेचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यामागणीसाठी आज, बुधवारी सकाळी डफळापूर ...
जत : म्हैसाळ योजनेचे पाणी डफळापुर भागात सोडावे व विजेचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यामागणीसाठी आज, बुधवारी सकाळी डफळापूर (ता. जत) येथे बसस्थानकाजवळील रस्त्यावर रास्तारोको आंदोलन झाले. सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते मन्सूर खतीब यांनी केले.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर भाई खतीब यांच्या नेतृवाखाली डफळापूर येथे जत सांगली मार्ग रोखून धरला. या आंदोलनात २० गावातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे सांगली मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. १४० विसर्गाने या भागाला पाणी मिळावे अशी जोरदार मागणी करत, जिरग्याल, एकुंडी, मिरवाड, वज्रवाड या भागाला प्रधान्याने पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पाऊस नसल्याने पिके वाळून गेली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे म्हैसाळ योजना चालू करून तालुक्यातील तलावात पाणी सोडण्यात यावे, कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विजेच्या मोटरी जळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमेतेने वीज पुरवठा व्हावा, ऊस व विविध पिकांचे पंचनामे करून एकरी २५ हजार अनुदान द्यावे, प्रती जनावरे १५० रुपये एका जनावरांसाठी चारा रक्कम पशुपालकांच्या खात्यावर जमा करावी अथवा चारा डेपो, छावणी सुरू करावी, बिळूर कालवा २ मध्ये म्हैसाळसाठी ज्या जमिनी संपादित केल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे पैसे तातडीने द्यावेत. अंकले येथील वीज उप केंद्राचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनकर्त्यांनी दिलेले निवेदन मंडल आधिकारी अंजली निमासोडे व वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता सुहास काळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, संचालक मन्सूर खतीब, जिरग्याळच्या सरपंच सारिका पाटील, उपसरपंच सुनंदा कोरे, शिंगणापूरच्या सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच अलका पांढरे, मिरवाडच्या सरपंच पप्पूबाई सौदी, डफळापूरचे माजी उपसरपंच शंकर गायकवाड, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.