येळापूरचा पाणी प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:38+5:302021-04-02T04:26:38+5:30
कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायतीकडून शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होत नाही. आवश्यक असलेल्या ठिकाणी गटर न ...
कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायतीकडून शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होत नाही. आवश्यक असलेल्या ठिकाणी गटर न बांधता भलतीकडेच बांधल्यामुळे लाखो रुपये वाया गेले आहेत. याची चौकशी करून कायमस्वरूपी पाणी प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी येळापूर येथील महिलांनी केली आहे. याबाबत आमदार मानसिंगराव नाईक व तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन दिले आहे.
येळापूर ग्रामपंचायतीअंतर्गत गावठाण आणि दहा वाडी-वस्ती असा परिसर आहे. गावठाण वगळता सर्व ठिकाणी ग्रामपंचायतीची विस्तारित नळ पाणी पुरवठा योजना सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा, ग्रामदैवत, विविध संस्था कार्यलये आहेत त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची ओरड आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, ग्रामपंचायतशेजारील शाळेच्या मैदानात असलेल्या कूपनलिकेवर याचा भार पडत आहे. याबाबत महिलांनी ग्रामपंचायतीस कळवूनही दखल घेतली नाही. तेव्हा आमदार व तहसीलदारांनी याकडे लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी निवेदनात केली आहे.
शिराळा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा अर्चना शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मानसिंगराव नाईक, शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.