भाजपच्या राष्ट्रवादी प्रेमाबाबत केला जाणार गोपनीय तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 06:02 PM2023-04-11T18:02:45+5:302023-04-11T18:03:10+5:30
अमृतकुंभ’अंतर्गत अहवालाची तयारी
सांगली : जिल्ह्यातील भाजपचे काही नेते राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रेमात असल्याबाबत तसेच विविध सहकारी संस्थांमधील घोटाळ्यातील त्यांच्या सहभागाबाबत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. भाजपच्या अमृतकुंभ योजनेअंतर्गत कानोसा घेतल्यानंतर त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. लवकरच या तक्रारींचा गोपनीय तपास केला जाणार आहे.
सांगलीत दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार मधू चव्हाण आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी सांगलीत आले होते. त्यासाठी भाजपने अमृतकुंभ अभियान सुरू केले आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत त्यांनी बैठका घेऊन तक्रारींच्या नोंदी घेतल्या होत्या. सांगलीतून काही गंभीर तक्रारी आल्या होत्या. त्याची गोपनीय चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे ज्या नेत्यांबद्दल तक्रार केली त्यांची चिंता वाढली आहे. तक्रारींच्या अनुषंगाने पक्षाच्या कार्यकारिणीत काही बदलही होऊ शकतात.
निष्ठावंत गटाने यापूर्वी अनेकदा स्वतंत्र बैठका घेऊन पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांबाबत तक्रारी केल्या होत्या. गेल्या काही वर्षांत निष्ठावंत गटाच्या या हालचालींकडे पक्षाने लक्ष दिले नव्हते. मात्र, राज्यभरात अनेक ठिकाणी असे प्रकार आढळून आल्यानंतर निष्ठावंत गटाला समावून घेत त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी अभियान सुरू केले आहे.
स्वतंत्र टीममार्फत चौकशी होणार
सूक्ष्म नियोजनावर भाजपचा अधिक भर राहिला आहे. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी असेच सूक्ष्म नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याअनुषंगाने संबंधित मतदारसंघातील पक्षाच्या कमजोरीचा शोध घेत त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने एक स्वतंत्र टीम चौकशी करण्याची चिन्हे आहेत.
जुन्या व नव्यांची मोट
जुन्या व नव्या अशा दोन्ही कार्यकर्त्यांची मोट बांधून निवडणुकीत उतरण्याची तयारी भाजपने केली आहे. त्यामुळे नव्या कार्यकारिणीत जुन्या लोकांचा समावेश करण्याची तयारी केली जात आहे.
पदाधिकारी बदलाच्या हालचाली
जिल्ह्यात अनेक वर्षांपासून एकाच पदावर काम करणाऱ्या लोकांबाबतही तक्रार झाल्याने पदाधिकारी बदलाबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. येत्या दीड महिन्यात बदलाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
प्रदेश कार्यकारिणीकडे अहवाल सादर होणार
- निष्ठावंतांच्या बैठकीतील तक्रारींच्या अनुषंगाने भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीकडे लवकरच अहवाल सादर होणार आहे.
- विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित मतदारसंघात दुरुस्ती करण्याची तयारी भाजपने केली आहे.
या तक्रारींची गंभीर दखल
- भाजपचे काही नेते राष्ट्रवादी नेत्यांशी सेटलमेंट करतात.
- राष्ट्रवादी नेत्यांच्या संस्थांमध्ये भाजपचे नेते संचालक आहेत.
- जिल्हा बँक, वसंतदादा बँकेसह अनेक सहकारी संस्थांच्या घोटाळ्यात भाजपचे नेते अडकलेत.
- घोटाळ्यात हात अडकल्याने विरोधकांशी लढण्याचे मुद्दे हातून गेले
- भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून व्यक्तिकेंद्री राजकारण