गलेलठ्ठ पगार अन् उसाचे उत्पन्न, गुरुजी उतरले खासगी सावकारीत; सांगलीतील मिरज पश्चिम भागात चित्र
By हणमंत पाटील | Published: October 16, 2023 05:43 PM2023-10-16T17:43:53+5:302023-10-16T17:46:31+5:30
दर महिन्याला दोन ते पाच टक्के व्याजाने व्यवहार सुरू
सचिन ढोले
समडोळी : सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून आता गुरुजींना गलेलठ्ठ पगार मिळत आहे. शिवाय तालुक्यातील गावाजवळ नोकरी असल्याने उसाची उत्पन्नही मिळत आहे. त्यामुळे मिरज पश्चिम भागातील काही गुरुजी (शिक्षक) सुध्दा खासगी सावकारीच्या व्यवसायामध्ये उतरले आहेत. थेट सावकारी अडचणीची असल्याने पत्नी अथवा नातेवाईकांच्या माध्यमातून ते व्याजाने पैसे देत आहेत. दर महिन्याला दोन ते पाच टक्के व्याजाने व्यवहार सुरू आहेत.
मिरज पश्चिम भागातील उसाच्या पट्टातील शिक्षकांनी हा नवा उद्योग सुरू केल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. या भागात मूळचा शेती व्यवसाय आहे. येथून अनेकजण शिकून शिक्षक व प्राध्यापक झाले. यामध्ये नव्याने शिक्षक म्हणून भरती झालेल्यांना पगार नाहीत. पण घरची ऊस शेती चांगली आहे. त्यामुळे ते दुय्यम व्यावसाय करून घर चालवितात. मात्र, पूर्वी शिक्षक व प्राध्यापक म्हणून सुरू झालेले अध्यापक कायमस्वरुपी परमनंट आहेत. त्यांना किमान ६० ते सव्वा लाखांपर्यंत पगार आहेत. त्यात उसाच्या उत्पन्नाची भर पडते. दुसरा कोणता व्यावसाय करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे कोणताही जागावाजा न करता ते महिन्याला दोन ते पाच टक्के व्याजदराने गरजूंना पैसा पुरवत आहेत.
गरजूंना हवी असलेल्या रकमेची अंदाज घेऊन काही शिक्षक १० हजारापासून ५० हजार रुपयांची रक्कम व्याजाने देतात. मूळ रक्कम थकीत राहिल्यास वसुलीचा दगादा लावण्यासही ते मागेपुढे पहात नसल्याचे चित्र आहे.
असा चालतो व्यवहार..
बँका, पतसंस्थांच्या तुलनेत केवळ तोंड ओळख आहे. गरजू असून आर्थिक पत पाहून मध्यस्थाच्या माध्यमातून व्याजाने पैसे देतात. शिक्षकांबरोबरचा व्यावहार आहे. आपले पैसे बुडणार नाहीत. त्यामुळे मध्यस्थ्यांची ही चांदी होताना दिसत आहे.
तक्रारदारांनी पुढे यावे : शिवाजीराव गायकवाड
ग्रामीण भागातील खासगी सावकारी मध्ये काही अद्यापक सक्रिय असल्याचे जनतेमध्ये दबकी चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तक्रारदारांची दखल घेऊन त्यांना निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट करून तक्रारदारांनी आमच्या खात्याशी संपर्क साधावे असे आवाहन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी केले आहे.