Satyajeet Tambe: सांगलीचा जावई झाला आमदार, गावात विजयी जल्लोष, सासरे आहेत सोने-चांदीचे व्यापारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 03:28 PM2023-02-03T15:28:48+5:302023-02-03T15:38:10+5:30
विटा शहरात अभिनंदनाचे फलक झळकले
दिलीप मोहिते
विटा : नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार सत्यजित सुधीर तांबे यांच्या रूपाने सांगली जिल्ह्यातील पारे (ता.खानापूर) गावचा जावई आमदार झाला आहे. त्यामुळे विटा शहरासह परिसरात नवनिर्वाचित आमदार ‘जावई’ पाहुण्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला.
सोने-चांदी व्यवसायानिमित्त तामिळनाडूच्या चेन्नई शहरात गेल्या दोन पिढ्यापासून स्थायिक असलेले पारे गावचे भीमरावशेठ साळुंखे व जेष्ठ उद्योजक प्रतापराव साळुंखे यांचे जुने पाहुणे असलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आ. सत्यजित हे भाचे आहेत. पारे येथील भीमरावशेठ यांचे सुपूत्र संदीपशेठ साळुंखे यांचे आ. तांबे हे जावई आहेत.
त्यांची कन्या डॉ. मैथिली या बीडीएस असून त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले. जेष्ठ उद्योजक प्रतापराव साळुंखे व डॉ. मैथिली यांचे आजोबा भीमरावशेठ यांच्या माध्यमातून डॉ. मैथिली यांचा नवनिर्वाचित आमदार सत्यजित यांच्याशी सन २०११ ला पुणे येथे विवाह झाला.
सत्यजित यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढविली. या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत तांबे यांना मोठे मताधिक्य मिळाल्याने पारे गावचा जावई आमदार झाला आहे.
या निकालानंतर विटा शहरासह पारे गावात जावई पाहुण्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले. पारे परिसरात जल्लोष करण्यात आला. त्यांचे सासरे संदीपशेठ, पत्नी नंदिनी, मुलगा भूषण, सून दिशा यांच्यासह साळुंखे कुटुंबियांनी कन्या डॉ. मैथिली यांच्या घरी जाऊन आमदार झालेल्या जावई पाहुण्यांचे अभिनंदन केले.