वडिलांच्या आठवणींना मुलाने सिलिकाॅनच्या पुतळ्यातून केले जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:34+5:302021-09-23T04:29:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मृत व्यक्तीला सिलिकॉनच्या पुतळ्यातून आभासात्मक जिवंत करण्याचा अनोखा प्रयत्न करीत भावनिक नात्यांचे दोर किती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मृत व्यक्तीला सिलिकॉनच्या पुतळ्यातून आभासात्मक जिवंत करण्याचा अनोखा प्रयत्न करीत भावनिक नात्यांचे दोर किती बळकट असतात याची प्रचिती सांगलीच्या कोरे कुटुंबीयांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी निरीक्षक रावसाहेब कोरे यांचे सेवेत असताना काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले. कोरे यांचे पुत्र अरुण यांच्यासह कुटुंबीयांना त्यांचे घरातील नसणे सहन होत नव्हते. त्यामुळे अरुण यांनी सिलिकॉनचा पुतळा तयार करण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर रावसाहेब कोरे यांचा सिलिकॉनचा पुतळा तयार होऊन सांगलीत दाखल झाला. घरी हा पुतळा ठेवल्यानंतर कुटुंबीयांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. व्यक्तीला जिवंत करणारी ही कलाकृती प्रेमबंधांना फुलविणारी ठरली. या पुतळ्यासोबत सर्वांनी छाायाचित्र काढले. मित्र, नातेवाईकांपर्यंत ही छायाचित्रे पोहोचताच आठवणी जिवंत झाल्या.
बंगळुरू येथील मूर्तिकार श्रीधर मूर्ती यांनी ही मूर्ती साकारली आहे. सिलिकॉनच्या या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पुतळा आहे की जिवंत व्यक्ती, असा प्रश्न पाहणाऱ्याला पडल्याशिवाय राहत नाही.
चौकट
तमिळनाडूच्या कुटुंबाची पुनरावृत्ती
तमिळनाडूतील श्रीनिवास गुप्ता या उद्योजकाने पत्नीच्या आठवणी जिवंत करण्यासाठी अशाप्रकारचा पुतळा ऑगस्ट २०२० मध्ये याच मूर्तिकारांकडून बनवून घेतला होता. त्याच भावनिक बंधाची पुनरावृत्ती सांगलीत झाली आहे.
कोट
वडिलांचे घरात नसणे आम्हाला सहन होत नव्हते. ते घरात आहेत, इतकीच भावना निर्माण करण्यासाठी सिलिकॉनचा पुतळा आम्ही तयार केला. या पुतळ्याच्या माध्यमातून जगण्याचे बळ मिळत आहे.
- अरुण कोरे, सांगली