गोटखिंडीच्या ऊसतोड मजुराचा मुलगा बनला मंत्रालयात अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 21:15 IST2023-07-25T21:15:13+5:302023-07-25T21:15:26+5:30
पहिल्याच प्रयत्नात यश : कष्ट, जिद्दीला गावकऱ्यांनी केला सलाम

गोटखिंडीच्या ऊसतोड मजुराचा मुलगा बनला मंत्रालयात अधिकारी
प्रतापसिंह माने
गोटखिंडी : उसाचे गोड कांडे तोडत कष्ट उपसणाऱ्या मजुराला संकटांचा कडवटपणा नेहमीच सतावत राहिला. दारिद्र्याशी झुंज कमी होती म्हणून की काय अपंगत्व पदरी पडले; मात्र संकटाचा अंधार दाटला असताना मुलाच्या कर्तृत्वाचा लख्ख प्रकाश त्यांच्या आयुष्यात पडला. मुलगा मंत्रालयात अधिकारी झाल्याची बातमी मजुराच्या घरी धडकली आणि त्यांच्या जगण्यात उसासारखाच गोडवा आला.
गोटखिंडी (ता. वाळवा) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा इंद्रजित अनिल डिग्रजकर याने राज्य सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात २८वा क्रमांक मिळवत मंंत्रालयातील महसूल सहायक अधिकारीपदी झेप घेतली. अनिल डिग्रजकर व त्यांची पत्नी सुरेखा यांंना दोन मुले आहेत. एक एकर जमीन आधाराला असली तरी व त्यातून घराला हातभार लागत नसल्याने अनिल यांना ऊसतोडणी मजूर म्हणून राबावे लागले. कष्ट उपसतानाच त्यांच्या पायास दुखापत झाली व नंतर त्यांचा पाय निकामी झाला. वडिलांची धडपड, त्यांचे कष्ट आणि त्यांच्यावर कोसळत असलेले संकट याची जाणीव दोन्ही मुलांना होती. त्यामुळे एकाने टेम्पो घेऊन मालवाहतूक करत हातभार लावला. इंद्रजितला मोठे अधिकारी होऊन आई-वडिलांचा पांग फेडायचा होता.
जिद्द, इच्छाशक्तीला कष्टाची जोड देत त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. याच गावातील रहिवासी व सध्या वर्धा येथील आरटीओ असलेले नीलेश पाटील, त्यांच्या पत्नी व पुण्यातील मोटर वाहन निरीक्षक ज्योती पाटील यांनी भक्कम साथ दिली. भाऊ प्रवीणनेही आधार दिला. त्यांच्या कष्टाला यश आले आणि पहिल्याच प्रयत्नात इंद्रजितने मंत्रालयाच्या अधिकारीपदापर्यंत मजल मारली.