sangli news: खानापूरचे जवान नायब सुभेदार जयसिंग भगत अनंतात विलीन; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 02:21 PM2023-01-21T14:21:20+5:302023-01-21T14:22:17+5:30

सियाचिन येथे कर्तव्य बजावताना बर्फवृष्टीमुळे मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने कोम्यात गेल्याने झाला मृत्यू

son of Khanapur Jawan Naib Subedar Jai Singh Bhagat merged with Anant; Funeral in military honors | sangli news: खानापूरचे जवान नायब सुभेदार जयसिंग भगत अनंतात विलीन; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

sangli news: खानापूरचे जवान नायब सुभेदार जयसिंग भगत अनंतात विलीन; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Next

पांडुरंग डोंगरे

खानापूर : खानापूरचे सुपूत्र, जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत (वय-४०) यांचे लेह लडाख विभागातील सियाचिन मध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावताना निधन झाले. त्यांच्यावर आज, शनिवारी खानापुरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू ) शंकर भगत यांचे पार्थिव पुणे येथून सकाळी नऊ वाजता खानापूर येथे आणण्यात आले. 'शहीद जवान अमर रहे ' ' नायब सुभेदार जयसिंग बाबू भगत अमर रहे ' ' भारत माता की जय ' अशा जयघोषात खानापूर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत शालेय विद्यार्थी, तरूण वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान भगत यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. पत्नी व लहान मुलांचे निशब्द चेहरे पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. खानापूर - गोरेवाडी रस्त्यालगत भगत यांच्या घराच्या पूर्वेला पटांगणावर जवान भगत यांचेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी भारतीय सैन्यदलाच्या २२ मराठा लाइट इन्फनट्रीच्या वतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. लष्करी व शासकीय मानवंदना देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने पालक मंत्री सुरेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष डॉ उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ दयानिधी राजा, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

खानापूर येथील जवान शहीद जयसिंग भगत हे सियाचिन येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. दोन दिवसांपूर्वी सियाचिन येथे बर्फवृष्टी झाली होती. त्यावेळी झोपेत त्यांचा मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने ते कोम्यात गेले. सदर घटना त्यांच्या साथीदारांच्या सकाळी निदर्शनास आली. त्यांनी सैन्यदलाच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना चंदीगड येथे दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

शहीद नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत हे सन २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सन २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

Web Title: son of Khanapur Jawan Naib Subedar Jai Singh Bhagat merged with Anant; Funeral in military honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली