‘सोनहिरा’ची सलग तिसऱ्या पंधरवड्यांची एफआरपी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 AM2021-01-08T05:26:30+5:302021-01-08T05:26:30+5:30
कडेगाव : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने एकरकमी एफआरपीनुसार प्रतिटन ३१७६ प्रमाणे ...
कडेगाव : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने एकरकमी एफआरपीनुसार प्रतिटन ३१७६ प्रमाणे सलग तिसऱ्या पंधरवड्याचे ऊसबिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेला ‘शब्द’ पाळल्याची प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
सोनहिरा कारखान्याचा गळीत हंगाम ३ नोव्हेंबरला सुरू झाला. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात कडेगाव येथे बैठक झाली. या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय जाहीर करत सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष आमदार कदम यांनी ऊसदराची कोंडी फोडली होती. इतर अनेक कारखानदारांनाही यावेळी एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते; परंतु सोनहिरा आणि उदगिरी शुगर्स या दोन कारखान्यांनी एकरकमी दिली. एफआरपीचे तुकडे करून ऊस बिले देणाऱ्या या कारखानदारांविरुद्ध संताप व्यक्त होत असतानाच ‘सोनहिरा’चे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी मात्र दिलेला ‘शब्द’ पाळला आहे. कारखान्याने ३ ते १५ नोव्हेंबर व १६ ते ३० नोव्हेंबर या दोन्ही पंधरवड्यांचे एकरकमी एफआरपीप्रमाणे ऊस बिल यापूर्वीच दिले आहे. आता १ डिसेंबर ते १५ डिसेंबर अशा तिसऱ्या पंधरवड्याचे ऊस बिलही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.
चौकट
सिंचन योजनांनाही ‘सोनहिरा’ची साथ
ताकारी आणि टेंभू सिंचन योजनांचे पाणी कडेगाव तालुक्यात दुष्काळी भागात आल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊसपुरवठा होत आहे. त्याची जाणीव ठेवून सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने दोन्ही योजनांची पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून कपात करून घेऊन जमा झालेली रक्कम संबंधित योजनेकडे भरण्याची परंपरा अखंडित ठेवली आहे.