Sangli Politics: कुटुंबात अनोखी आघाडी!, आई काँग्रेसच्या नेत्या, मुलीच्या खांद्यावर राष्ट्रवादीची धुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:54 PM2024-08-08T12:54:13+5:302024-08-08T12:54:51+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षपदी सोनिया सत्यजित होळकर
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षपदी सोनिया सत्यजित होळकर यांची बुधवारी निवड करण्यात आली. सोनिया होळकर या सांगलीचे दिवंगत काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या कन्या आहेत. आई जयश्रीताई पाटील यासुद्धा काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात अनोखी आघाडी नोंदली गेली आहे. सोनिया यांची निवड सांगलीच्या राजकीय पटावर सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात बुधवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याहस्ते होळकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नाशिकचे निरीक्षक आमदार सुनील भुसारा, गोकुळ पिंगळे, दत्तात्रय पाटील उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, पक्ष बळकटीसाठी तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी सोनिया होळकर चांगले कार्य करतील, असा विश्वास वाटतो.
सोनिया होळकर सध्या नाशिक येथे सासरी राहतात. कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या संचालकपदी त्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादीच्या नाशिक शहर युवती आघाडीचे नेतृत्व त्यांनी केले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी मंत्री मदन पाटील यांच्या त्या कन्या आहेत. सोनिया यांच्या आई जयश्रीताई पाटील सध्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा व काँग्रेसच्या नेत्या म्हणून सांगलीतील राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
जयंत पाटील व मदन पाटील यांच्यात पूर्वी राजकीय संघर्ष होता. मात्र सांगली जिल्हा बँकेच्या एका निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र आले होते. मदन पाटील यांनी राष्ट्रवादीत यावे म्हणून जयंत पाटील यांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना यश आले नाही. मदन पाटील यांच्या पश्चात जयश्रीताई पाटील यांनाही राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी जयंत पाटील यांच्याकडून प्रयत्न झाले होते. मात्र, जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आता मदन पाटील यांच्या कन्येला महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर या निवडीची चर्चा राजकीय पटावर रंगली आहे.