धनगर समाजासाठी लवकरच वसतिगृह - सुधीर गाडगीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:21 AM2018-08-26T00:21:05+5:302018-08-26T00:30:31+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल. तसेच धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृह उभारण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी
सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल. तसेच धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृह उभारण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी केली.
सांगली महापालिका निवडणुकीत धनगर समाजाचे सर्व पक्षाचे मिळून बारा नगरसेवक निवडून आले आहेत. समस्त धनगर समाजाच्यावतीने शनिवारी नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. आमदार गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष तात्यासाहेब गडदे, महापौर संगीता खोत, भाजपचे नेते शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर ,विठ्ठल खोत यांच्यासह धनगर समाजाचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
गाडगीळ म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका आता पार पडल्या आहेत. आता सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व तुम्ही करीत आहात. आपण प्रभागाचे नगरसेवक आहोत, हे लक्षात ठेवून विकास कामे करायला हवीत. सांगलीच गतवैभव परत मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करायला हवे. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम निश्चित पूर्ण करु. मंत्री राम शिंदे यांनी ओबीसी समाजाचे पहिले वसतिगृह सांगलीला देऊ, अशी घोषणा केली होती. आता सर्व धनगर समाजाच्या नगरसेवकांनी आणि आम्ही मिळून हे वसतिगृह निर्माण करुन देऊ.
महापौर संगीता खोत म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री, आमदार गाडगीळ, आमदार खाडे यांनी या शहराचा पहिल्या महापौर पदाचा मान माझ्यासारख्या धनगर समाजातील स्त्री उमेदवाराला दिला. विकासकामाला निधी कमी पडणार नाही. महापौर म्हणून मी स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन पारदर्शी कारभार करू, अशी ग्वाही दिली.
शेखर इनामदार म्हणाले, भाजपला एकेकाळी ठराविक जातीचा पक्ष म्हणून हिणवले जात होते, आज खऱ्याअर्थाने धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून भाजप पुढे येत आहे. धनगर समाजाला भाजप सरकारच आरक्षण देणार आहे. शहराच्या विकासाकरिताही भाजप कटिबद्ध असून, सुसह्य जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी शहरात होतील.
यावेळी प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, नगरसेवक विष्णू माने, प्रकाश ढंग, गजानन आलदर, कल्पना कोळेकर, सविता मदने आदींची भाषणे झाली. स्वागत-प्रास्ताविक तात्यासाहेब गडदे यांनी केले. आभार बाळासाहेब फोंडे यांनी मानले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले.
मते न देणाºयांवर अन्याय नको!
गाडगीळ म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर एखाद्या भागातून मतदान मिळाले नाही म्हणून त्या भागात काम करायचे नाही, असे कोणीही करू नये. माणसांची मते कामाने बदलतात. काम करणारा माणूस समाज बघतो. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कुणी काम घेऊन आला तर कुणालाही नाही म्हटले नाही.
सांगलीत शनिवारी धनगर समाजाच्या नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी डावीकडून (पहिली रांग) विठ्ठल खोत, शेखर इनामदार, अण्णासाहेब गडदे, आ. सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत आदी उपस्थित होते.