पूर ओसरताच नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:12+5:302021-07-26T04:24:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील पाणीपातळी वाढत आहे. विसर्गामुळे पाण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारपासून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील पाणीपातळी वाढत आहे. विसर्गामुळे पाण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारपासून पाणी ओसरण्यास सुरुवात होईल. पाणी ओसरताच शेती, घरांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा, असे आदेश पालकमंंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पूरस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, २०१९ वेळी महापुराच्या वेळी झालेल्या पावसापेक्षा आताच्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. पावसाने आता उसंत दिली असली, तरी विसर्गामुळे फुगवटा कायम आहे. भविष्यात असाच पाऊस आला, तर त्यासाठी अत्यंत नेटके नियोजन हवे.
पाणी ओसरताच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने औषध फवारणी करून घ्यावी. पाण्याखाली गेलेल्या पाणीपुरवठा योजनांची त्वरित दुरूस्ती करून करून घ्यावी. पुरात अडकलेल्या लोकांना अडचणीच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक तेथे रस्ते, पूल यांची उंची वाढविण्यासाठी आराखडे तयार केल्यास भविष्यात पुराचा त्रास होणार नाही.
दुधगाव, शिगाव भागात पाणी पसरले असून, वारणेतून होणारा २८ हजार क्युसेक्स विसर्ग १६ हजारांवर करण्यात आला आहे. सांगलीतील पाणी ८ ते १० तासांत ओसरेल. पाणी ओसरताच यंत्रणांनी करावयाच्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार, प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून नियोजन करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
चौकट
पालकमंत्री पाटील म्हणाले, पुरामुळे स्थलांतरित कराव्या लागलेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे. त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेऊन निवारा केंद्रातील सोईसुविधांवर प्रशासनाने लक्ष द्यावे.