महागाईने करपली भाकरी; राज्यात ज्वारीच्या क्षेत्रात सव्वाचार लाख हेक्टरने घट, दरात वाढ
By अशोक डोंबाळे | Published: February 9, 2023 02:39 PM2023-02-09T14:39:12+5:302023-02-09T14:45:48+5:30
ऊस, फळबागा आणि अन्य पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा तज्ज्ञांचा अंदाज
अशोक डोंबाळे
सांगली : गरिबांचे प्रमुख अन्न असलेली भाकरी दिवाळीनंतर महागली आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे क्षेत्र चार लाख ३२ हजार ३७५ हेक्टरने घटल्यामुळे ज्वारीचे दर वाढले आहेत. दिवाळीपूर्वी ३५ रुपये किलो असलेला शाळू सध्या ४५ ते ५३ रुपये झाला आहे. गव्हापेक्षा ज्वारीचा दर अधिक असल्यामुळे भाकरीची श्रीमंतांचे अन्न होण्याकडे वाटचाल सुरू आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात २०१६-१७ ते २०२०-२१ यादरम्यान ज्वारीचे क्षेत्र १७ लाख ३६ हजार २८६ हेक्टर होते. २०२२-२३ या वर्षात ते १३ लाख ३९११ हेक्टरवर आले आहे. चार लाख ३२ हजार ३७५ हेक्टरने घट झाली आहे. ऊस, फळबागा आणि अन्य पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. लागवड कमी झाल्यामुळे सध्या ज्वारीचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. दिवाळीपूर्वी ३० ते ३५ रुपये किलो असणारी ज्वारी ४५ ते ५३ रुपयांवर गेली आहे.
श्रीमंतांनाही गोड वाटू लागली
गरिबांचे प्रमुख अन्न म्हणून भाकरी ओळखली जाते. ग्रामीण भागात भाकरीला पसंती असली, तरी शहरात गव्हाची चपाती खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शाळूपेक्षा गव्हाचा दर अधिक असायचा. परंतु, भाकरीमुळे शरीराला फायदा होत असल्याने अनेकजण चपाती सोडून भाकरीकडे वळत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांकडून ज्वारीची भाकरी खाण्याबाबत सल्ला दिला जात असल्यामुळे गरिबाघरची भाकरी श्रीमंतांनाही गोड वाटू लागली आहे.
आवक घटल्यामुळे दर वाढले
सांगली बाजार समितीमध्ये एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ९० हजार २८३ क्विंटल शाळूची आवक झाली होती. सरासरी दर ३२०० ते ३५०० रुपये क्विंटल होता. यंदा याच काळात ८६ हजार २१ क्विंटल आवक झाली आहे; तर सरासरी दर ४५०० ते ५३०० रुपये क्विंटल आहे.
ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे स्थानिक ज्वारीची आवक यंदा घटली आहे. ती बाजारात आली असती, तर शाळूचे दर वाढले नसते. यंदा शाळूचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. पंधरा दिवसांत नवीन शाळू बाजारात येईल. - संजय चौगुले, होलसेल व्यापारी, सांगली.